राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा गमावली, दोन कमावल्या... - Kerala Assembly election NCP has won two seats | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा गमावली, दोन कमावल्या...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

मुंबई : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका तसेच देशातील विविध राज्यांतील विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे कालचा रविवार 'सुपर संडे' ठरला. तृणमुल काँग्रेसने बंगालमध्ये इतिहास घडवत हॅट्रिक केली. तर आसाम भाजपकडेच राहिले. तमिळनाडू व पुदुच्चेरीत सत्तांतर झाले तर डाव्यांनी केरळात इतिहास रचला. महाराष्ट्रात झालेल्या पंढरपुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पराभूत झाली.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी ३ हजार ७३३ मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. आवताडे यांना १ लाख ०९ हजार ४५० मते मिळाली, तर भालके यांना १ लाख ०५ हजार ७१७ मते मिळाली आहेत. पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय  मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. 

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला असला तरी केरळमध्ये पक्षाला दोन जागांवर विजय मिळाला आहे. 2016 मध्ये मिळालेल्या दोन जागा पक्षाने कायम राखल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी डाव्या आघाडीसोबत आहे. पक्षाकडून तीन मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात आले होते. मुख्यमंत्री विजयन यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असलेले ए. के. शशीधरन हे एलाथुर मतदारसंघातून 38 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार सुल्फीकर मायुरी यांचा पराभव केला. 

कुट्टनाड मतदारसंघात राष्ट्रवादीचे थॅामस के थॅामस यांनी केरळ काँग्रेसचे जेकब अब्राहम यांचा साडे पाच हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला. या दोन्ही जागा यापूर्वीच्या 2016 निवडणुकीतही पक्षाकडेच होत्या. कोट्टाक्कल मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. पक्षाचे उमेदवार एन. ए. मुहम्मद कुट्टी यांचा इंडियन युनियम मुस्लिम लीगच्या उमेदवाराने 16 हजार 588 मतांनी पराभव केला आहे. 

भाजपला एकही जागा नाही

भाजपने 2016 मध्ये नेमॅान मतदारसंघातून विजय मिळवला होता. पण यावेळी हा मतदारसंघही हातातून निसटला. मागील निवडणूकीत भाजप सात मतदारसंघात दुसऱ्या स्थानावर होते. यावेळी केवळ पाच मतदारसंघात भाजपने चांगली लढत दिली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी कोन्नी आणि मंजेश्वर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेली मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांचाही पराभव झाला आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख