मुंबई : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी (ता. 29 जानेवारी) रात्री रिव्हॉल्वर दाखविणाऱ्या चौघांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चार जणांपैकी कोणीही शिवसैनिक नसल्याचा खुलासा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.
विकास गजानन कांबळे, विजय प्रकाश, सीताराम मिश्रा, राम मनोज यादव (सर्व रा. मुंबई) अशी खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत.
वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेचे स्टीकर मोटारीवर असलेल्या एका मोटारचालकाने रिव्हॉल्वरच बाहेर काढल्याची खळबळजनक घटना पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी (ता. 29 जानेवारी) रात्री घडली होती. सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालेला हा व्हिडिओ ट्विट करीत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, तसेच माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली होती.
याबाबत गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले की, एक्स्प्रेस वेवर रिव्हॉल्वर दाखविणारे शिवसैनिक नाहीत. काही राजकीय लोकांनी चुकीच्या पद्धतीने आरोप केले आहेत. दोन रिव्हॉल्वरपैकी एक रिव्हॉल्वर बनावट असून तर दुसऱ्याची चौकशी सुरू आहे. या चौघांपैकी कोणीही शिवसैनिक नाही. एकूण चार जणांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
काय आहे प्रकरण?
वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेचे स्टीकर मोटारीवर असलेल्या एका मोटारचालकाने चक्क रिव्हॉल्वरच बाहेर काढल्याची खळबळजनक घटना पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी (ता. 29 जानेवारी) रात्री घडली. सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालेला हा व्हिडिओ ट्विट करीत या स्वैराचाराची गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक दखल घेतील का? अशी खोचक टिपण्णी करीत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले होते.
माजी खासदार नीलेश राणे यांनीही ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, चालत्या गाडीतून पिस्तूल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टीकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
एमएच-47 असा या गाडीचा अर्धवट नंबर असल्याने ती मुंबईतील बोरीवलीची असावी, असे "आरटीओ'तून सांगण्यात आले. मात्र, हत्यार उपसणारा हा कोण? शिवसेनेचा कार्यकर्ता की पदाधिकारी? अशी चर्चा सोशल मीडियात आता सुरु झाली होती.
एक्स्प्रेस वे तथा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गच नव्हे, तर पुणे-मुंबई महामार्गावरही शनिवार, रविवारी मोठी वाहतूक कोंडी होते. टोलनाक्यावर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. मुंबईच्या या पठ्ठ्याने वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी चक्क रिव्हॉल्वरच समोरच्या आडव्या येत असलेल्या ट्रकचालकांवर उगारत कोंडीतून आपली सुटका करून घेतल्याने तो चर्चेचा विषय झाला.

