It is a disgrace to withdraw the decision of two kilometers on Thackeray government due to Ajit Pawar's pressure! | Sarkarnama

अजितदादांच्या दबावामुळे ठाकरे सरकारवर दोन किलोमीटरचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 जुलै 2020

अजित पवार यांनी गेल्या दोन जुलैरोजी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी घेतलेल्या कोरोना संदर्भाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झुकले असून त्यांनी कोरोनोच्या पार्श्वभूमी दोन किलोमीटरची जी अट टाकली होती ती मागे घेतली आहे. तशी अट मागे घेतल्याने ठाकरे सरकारवर नामुष्की आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

अजित पवार यांनी गेल्या दोन जुलैरोजी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी घेतलेल्या कोरोना संदर्भाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. दोन किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करू नका या आदेशामुळे जनतेमध्ये नाराजी होती. हा आदेश मागे घ्यावा अशी मागणीही जनतेमधून होत होती. जनतेची ही मागणी लक्षात घेऊन अजितदादांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. आपण हा आदेश मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केली होती. 

शिवसेनेने विशेषत: मुख्यमंत्री कार्यालयाने नोकरशाहीवर अवलंबून राहत निर्णय घेत आहे हे योग्य नसल्याची नाराजीही अजितदादांनी व्यक्तही केली होती. आघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेटही घेतली होती. शेवटी आज ठाकरे सरकारने जो दोन किलोमीटरचा आदेश दिला होता तो मागे घेतला आहे. 

केंद्राच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध
 कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र) इंटक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघ यांच्या वतीने केंद्र सरकारच्या कथित कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ शुक्रवारी निषेध दिन पाळण्यात आला. मुंबईसह राज्यातील गिरण्या, कारखाने, बॅंका, एसटी कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला.

कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विश्‍वास उटगी, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते आदींनी निषेध दिन पाळण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने मुंबईतील गिरण्यांच्या प्रवेशद्वारांवर पाच-पाच कामगारांद्वारे विरोधाचे फलक लावून निषेध नोंदवण्यात आला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख