Instructions to take action on mentioning Kovid 19 on students' marks | Sarkarnama

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड 19 उल्लेख करण्यांवर कारवाई करण्याचे निर्देश

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 जुलै 2020

कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड19 चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे.

मुंबई : कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड 19 असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

यासंदर्भात राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत. 

यासंदर्भात महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात कृषीमंत्र्यांनी म्हटले आहे की, कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड19 चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश या पत्रात दिले आहेत.

आदिवासी गावांच्या विकासासाठी 160 कोटी 

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्र) 13 जिल्ह्यातील 5 हजार  982गावांकरिता 5टक्के थेट अबंध निधी योजनेचा 160 कोटी 73 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

हा निधी ग्रामसभांनी संबंधीत आदिवासी गावांतील विविध विकास कामांकरिता खर्च करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 
आदिवासी भागातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा निधी थेट त्या गावांना देण्याची योजना आहे. 

या निधीतून गावांमध्ये विविध पायाभूत सुविधांचा विकास, वनहक्क अधिनियम व पेसा कायद्याची अंमलबाजवणी, आरोग्य, स्वच्छता व शिक्षण, वनीकरण, वन्यजीव संवर्धन, जलसंधारणाची विविध कामे, वनतळी, वन्यजीव पर्यटनास चालना देणारे उपक्रम, वन उपजिविका आदी विविध कामे करता येतात.  

यापुर्वी ही योजना आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत होती. परंतु जनजाति सल्लागार परिषदेच्या पन्नासाव्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार 19 जून  2019पासून ही योजना ग्रामविकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख