कंगनावर कायदेशीर कारवाईचा ठराव संमत करा : प्रताप सरनाईकांची मागणी - Initiate Criminal Case Against Kangana Ranaut Demands Sena MLA Pratap Sarnaik | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनावर कायदेशीर कारवाईचा ठराव संमत करा : प्रताप सरनाईकांची मागणी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

मुंबईची पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी तुलना केल्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव संमत करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. तसे लेखी पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे

मुंबई  : मुंबईची पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी तुलना केल्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव संमत करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. तसे लेखी पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले असून यावर तातडीने चौकशी करुन अहवाल सादर करावा, असे विधानसभेचे उपाध्यक्ष व आताच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नरहरी झीरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. 

संयुक्त महाराष्ट्राला ६० वर्षे पूर्ण झाली असून १०६ हुतात्म्यांनी यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. कित्येक वीरांनी या मुंबईसाठी रक्त सांडले. अनेक आंदोलने झाली व त्यानंतर हा अखंड महाराष्ट्र झालेला असताना परराज्यातून आलेली एक मुलगी या मुंबईत येऊन अभिनेत्री बनते, नांव व पैसा कमावते व त्याच मुंबईला बदनाम करत असताना तिच्यावर कारवाई न झाल्याने आम्हा लोकप्रतिनिधींना दुःख झाले आहे, असे सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

काही दिवसांपूर्वी कंगनाने ट्वीट करुन मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सातत्याने आवाज उठवणाऱ्या कंगनाने महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा व्यवस्था घेणार नाही, असेही वक्तव्य केले होते. मला हिमाचल प्रदेश सरकारने किंवा केंद्र सरकारने संरक्षण पुरवावे, अशी तिची मागणी होती. दरम्यान, कंगनाला केंद्रीय गृहमंत्र्यालयाने Y दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. 

कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून कंगनावर टीका केली होती. कंगनाला सुरक्षित वाटत नसेल तर तिने मुंबईत येऊच नये, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. अन्य काही शिवसेना नेत्यांनीही कंगनाला उद्देशून धमकीवजा वक्तव्ये केली होती. त्यानंतर काल कंगनाने संजय राऊत यांना आव्हान देत आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहोत, असे आव्हान दिले. 

कंगनाने ट्वीट करुन आपल्याला सुरक्षा पुरविल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. "आता कुणा देशभक्ताचा आवाज कुणी दाबू शकणार नाही, हे सिद्ध झाले आहे. अमित शहा मला मुंबईला जाणे पुढे ढकलण्याचा सल्ला देऊ शकले असते. पण त्यांनी भारताच्या कन्येचा मान राखला. आमचा स्वाभीमान आणि आत्मसन्मानाची लाज राखली. मी अमित शहा यांची आभारी आहे," असे कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख