If you don't trust the police, Amrita Fadnavis should leave Khushal Raj, Anil Paraba's advice | Sarkarnama

  पोलिसांवर विश्वास नसेल तर अमृता फडणविसांनी खुशाल राज्य सोडावे, अनिल परबांचा सल्ला 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध नाही. कोण म्हणते ते पार्टीला गेले, कोण म्हणते नाही गेले. ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी ते मीडियासमोर घेऊन सिद्ध करावे.

मुंबई : सरकार बदलले तरी पोलीस तेच राहतात.ज्यांची सुरक्षा घेऊन त्या गेली पाच वर्ष फिरल्या, त्या पोलिसांवरच अविश्वास असेल, तर अमृता फडणवीसांनी खुशाल राज्य सोडून जावे, असा सल्ला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना लक्ष्य करीत मुंबई विषयीही विधान केले होते. मुंबई सुरक्षित कशी नाही असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. राष्ट्रवादीपाठोपाठ आता शिवसेनेनेही त्यांना लक्ष्य केले. 

परब यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांची सतत स्तुती केली, शाबासकी दिली. त्या पोलिसांबद्दल केवळ खुर्ची गेली म्हणून असे बोलणे चुकीचे आहे. अमृता फडणवीसांना असुरक्षित वाटावे असे काय घडले ? कुठला मुंबईचा नागरिक म्हणतो की त्यांना असुरक्षित वाटते. ही खुर्ची गेल्याची तडफड दिसते. 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना परब म्हणाले, की सुशांतसिंग राजपूत प्रकरण बिहार निवडणुकीसाठी सुरु आहे. आम्ही मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठाम आहोत. मुंबई पोलीस तपासासाठी सक्षम आहेत. सीबीआयची मागणी कोणीही केली म्हणून केस त्यांच्याकडे देता येत नाही, त्याची कारणे द्यावी लागतात.

गेल्या पाच वर्षात किती आत्महत्या झाल्या ? त्यापैकी किती तपास सीबीआयकडे दिले ? गेल्या पाच वर्षात किती हत्याकांड झाले? केवळ राजकारण म्हणून हे सुरु आहे. नितीशकुमार हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख नाहीत. त्यांनी त्यांच्या राज्याबाबत भाष्य करावे. असेही ते म्हणाले. 

केवळ युवा नेत्याचे नाव खराब करायचे, मुख्यमंत्र्यांची इमेज खराब करण्यासाठी हे षडयंत्र आहे. पुरावे असतील तर पोलिसांकडे द्यावे. नरेंद्र मोदी यांच्यावरही गोध्रा हत्याकांडाचे आरोप झाले. अमित शाह यांचेही नाव सोहराबुद्दीन प्रकरणात समोर आले. न्यायमूर्ती लोहिया केसमध्येही शाह यांच्यावर आरोप झाले. असे दाखले अनिल परब यांनी दिले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख