जेव्हा प्रजेला मुर्ख बनवता येते; तेव्हा राजा पराभवाचा सुद्धा आनंदोत्सव साजरा करतो!

''रेमडीसिवीर या कोरोनावरील औषधाची निर्यात थांबवण्याचा "महत्वपूर्ण" निर्णय केंद्र सरकारने घेतला ही बातमी पाहिल्यावर मस्तकशूळ उठला.
 Jitendra Awhad, Narendra Modi .jpg
Jitendra Awhad, Narendra Modi .jpg

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ११ ते १४ एप्रिलदरम्यान कोरोना लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. देशात अनेक राज्य लसींचा साठा कमी असल्याची तक्रार करत आहेत. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींनी उत्सव साजरा करण्याचे आवाहन केल्याने टीका होत आहे. त्यातच नरेंद्र मोदींनी रविवारी उत्सव ही दुसरी लढाई असल्याचा उल्लेख केला. त्यावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

आव्हाड म्हणाले की ''रेमडीसिवीर या कोरोनावरील औषधाची निर्यात थांबवण्याचा "महत्वपूर्ण" निर्णय केंद्र सरकारने घेतला ही बातमी  पाहिल्यावर मस्तकशूळ उठला. याचा अर्थ ही निर्यात अजून सुरु होती? कोरोनाची दुसरी लाट काही आठवड्यांपूर्वी आल्यानंतर या औषधाची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. डॉक्टर्स त्यावर लाल निशाण फडकवत होते. रुग्णांची संख्या काही हजारांनी वाढली तेव्हा तर इतका तुटवडा निर्माण झाला की शेकडो लोक त्याच्या अभावी मरण पावले. रेमडीसिविरचा काळाबाजार सुरु झाला. पण पैसा आणि सत्ता यांच्या व्यसनाधीन झालेल्या मोदी सरकारला लोकांच्या जीवाची किंमत नव्हती. पंतप्रधान तर निवडणूक प्रचार या आपल्या आवडत्या छंदात रमले होते'', अशा शब्दात आव्हाड यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.

''आज जवळपास प्रत्येक राज्य आपापल्या तुटपुंज्या साधन सामग्रीनिशी कोरोनाशी लढत आहे. खुद्द पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये खचाखच भरलेल्या रुग्णाल्यांमध्ये बाहेर पदपथावर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अवस्था इतकी वाईट आहे की गुजरात उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन संबंधितांना नोटिसा पाठवल्यात. त्यात कहर म्हणजे कुणी पाटील नावाचे गुजरात प्रदेश भाजप अध्यक्ष आपल्या घरात रेमडीसिविरचे दुकान उघडून बसलेत. त्यांच्यापाशी इतका साठा कुठून आला याचे उत्तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे नाही. काय समजायचे यातून? मोदींना याची कल्पना नसेल अशा भ्रमात रहायचे? मुळात त्यांनी स्वतः काय केले''? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
  
''भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात लसींची अमाप गरज आहे. हे माहीत असूनही जगभर भाव खाण्यासाठी ते इतके दिवस लसी निर्यात करत होते. आज प्रत्येक राज्यात लसींचा तुटवडा आहे आणि कोरोनाच्या रुग्णांच्या प्रेतांचे ढीग पडतायत. पण त्यांच्या मनमानी कारभार पद्धतीत बदल नाही'', असेही आव्हाड म्हणाले. 

या निर्याती, हे दुर्लक्ष, हा केवळ त्यांच्यातली मानवी संवेदना माणुसकी नष्ट झाल्याचा पुरावा आहे. लोकांना टोचायला लसी नाहीत, लसीकरण केंद्र बंद पडताहेत, आणि मोदी "टिक्का उत्सव" साजरा करताहेत. भक्त त्यात टाळ घेऊन नाचतील. लसीकरणात आपण चिलीसारख्या देशाच्या सुद्धा मागे आहोत याची जाण न ठेवता, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आपण तयार केलेल्या लसी चांगल्या दर्जाच्या नाहीत असे माझे मुळीच म्हणणे नाही. पण परदेशात बनलेल्या लसींबद्दल, अशा आणीबाणीच्या प्रसंगी, मोदींच्या मनात इतकी अढी का, त्यांच्या आयातीवर बंदी का, हे विचारात घेण्याजोगे प्रश्न असल्याचे आव्हाड म्हणाले. फायझर, जॉन्सन, स्पुटनिक या लसी अख्ख्या युरोप अमेरिकेत वापरल्या जात आहेत. ज्या भारतीय नागरिकांची ऐपत आहे, ते आपल्या खिशातून पैसे देऊन, आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्याने या लसी घेतील की! 

सरकारकडून लस उपलब्ध होईपर्यंत त्यांनी तणावाखाली का जगावे? उलट त्यामुळे सरकारवरचा भार हलका होईल. मोठ्या प्रमाणात लसीकरण चपळाईने होईल. सरकारी लसी राहू दे गोरगरिबांसाठी. पण कोविशिल्ड आणि कोवेक्सिन वगळता आज अन्य जागतिक लसी येऊच द्यायच्या नाहीत या धोरणाला काही अर्थ नाही. किंवा यात काहीतरी 'अर्थकारण' आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय, असा आरोप आव्हाड यांनी केला. "जेव्हा प्रजेला मुर्ख बनवता येते तेव्हा राजा लढाईतील पराभवाचा सुद्धा आनंदोत्सव साजरा करतो!" असा मार्मिक टोला त्यांनी लगावला आहे. 
Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com