मुंबई पालिकेतील विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडेच; भाजपची याचिका फेटाळली - High Court Dismisses BJP Claim on BMC Leader of Opposition | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई पालिकेतील विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडेच; भाजपची याचिका फेटाळली

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर भारतीय जनता पक्षाने केलेला दावा, उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.  मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडेच राहणार यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या पदावर काँग्रेसचे रवी राजाच राहणार हे स्पष्ट झाले आहे

मुंबई :  महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर भारतीय जनता पक्षाने केलेला दावा, उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.  मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडेच राहणार यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या पदावर काँग्रेसचे रवी राजाच राहणार हे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेत गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ता काळात मित्र पक्ष असलेल्या भाजपाने राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यावर पालिकेत विरोधाची भूमिका घेतली होती. त्यानंतर विरोधी पक्ष नेते पदावर दावा करत भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

पालिकेच्या नियमाप्रमाणे काँग्रेसला देण्यात आलेले विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडेच राहणार की भाजपाकडे जाणार याबाबतचा निकाल न्यायालय देणार असल्याने राजकीय पक्षांच्या नजरा उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागल्या होत्या. 

मुंबई महापालिकेत २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता असताना गेल्या काळात भाजप हा शिवसेनेचा मित्रपक्ष होता. २०१४ मध्ये केंद्रात सत्ता येताच भाजपने मुंबईत हातपाय पसरायला सुरुवात केली. शिवसेना व भाजप यांनी २०१७ मधील महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे ८५ आणि भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले. 

त्यानंतर महापौरांच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. भाजप पहारेकऱ्याची भूमिका बजावेल; विरोधी पक्षात बसणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे आले. या पदावर रवी राजा यांची नियुक्ती झाली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर  विधानसभेत भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. 

त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात भाजपने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला. यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार मनोज कोटक, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, सरचिटणीस सुनील कर्जतकर, आमदार सुनील राणे, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत गटनेतेपदासाठी विनोद मिश्रा आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रभाकर शिंदे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. उपनेतेपदी उज्ज्वला मोडक व रिटा मकवाना यांची नावे जाहीर करण्यात आली होती. तसे पत्रही महापौरांना देण्यात आले होते. 
Edited By- Amit Golwalkar  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख