परमबीरसिंह यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात नाट्यपूर्ण घडामोडी : स्टेशन डायरी सादर करण्याचा आदेश - High Court Asks government to Submit Station Diary in Jayashree Patil Complaint | Politics Marathi News - Sarkarnama

परमबीरसिंह यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात नाट्यपूर्ण घडामोडी : स्टेशन डायरी सादर करण्याचा आदेश

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 31 मार्च 2021

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर मुंबईच्या वकिल अॅड. जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीचा तपशील असलेली 'स्टेशन डायरी' जो पर्यंत आमच्यासमोर आणली जाणार नाही, तो पर्यंत आम्ही उठणार नाही, अशी कडक भूमीका आज परमबीर सिंग यांच्या याचिकेची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाने घेतली.

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटी रुपयांचे हफ्ते मागितल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज दिवसभर सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश न्ययामूर्ती दीपंकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय खंडपीठाने याचिकाकर्ते आणि राज्य सरकार यांना अनेक प्रश्न विचारले.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर मुंबईच्या वकिल अॅड. जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीचा तपशील असलेली 'स्टेशन डायरी' जो पर्यंत आमच्या समोर आणली जाणार नाही, तो पर्यंत आम्ही उठणार नाही, अशी कडक भूमिका दत्ता यांनी घेतली. ती स्टेशन डायरी घेऊन पोलिस निरीक्षक न्यायालयात आले. पण स्टेशन डायरीत त्या तक्रारीची नोंद घेतलेली नाही, असे अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना न्यायालयात सांगितले. त्यावर का केली नाही, असा न्यायालयाने प्रश्न विचारला.

परमबीरसिंह यांनाही विचारले सवाल

पोलिस अधिकारी या नात्याने तुमचे वरिष्ठ काही गैर करत असतील तर तुम्ही त्यांच्या विरोधात पोलिस तक्रार का दाखल केली नाहीत, असा सवाल परमबीर सिंग यांना न्यायलयाने पहिल्या सत्रात विचारला होता. तसेच गुन्हा दाखल नसताना आम्ही थेट सीबीआय चौकशीचे आदेश कसे देऊ शकतो, असाही प्रश्न त्यांच्या वकिलांना विचारला. वाझे यांच्याकडे अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये परमबीरसिंह यांच्या उपस्थितीत मागितले का? जे सहायक पोलिस आय़ुक्त सतिश पाटील यांचा दाखला परमबीरसिंह हे देत आहेत, त्यांचे प्रतिज्ञापत्र का सादर नाही केले? तुम्हाला गुन्हा दाखल करून हवा असेल तर न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तुम्ही का गेला नाहीत? पोलिस आयुक्त आणि राजकारणी हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असे अनेक प्रश्न दत्ता यांनी विचारले. 

याच प्रकरणात अॅड. पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत न्यायालयाने कौतुक केले. एका तरी नागरिकाने या प्रकरणात पोलिसांकडे जाण्याचे धैर्य दाखवले, असे न्यायमूर्ती म्हणाले. मात्र याच प्रकरणात अॅड जयश्री पाटील यांचा काय संबंध, असा सवाल दुसऱ्या एका खंडपीठाने काल विचारला होता. पाटील यांची याचिका म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचा कठोर अभिप्राय न्यायमूर्ती सतिश शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आज मात्र मुख्य न्यायमूर्तींनी पाटील यांचे धाडसाबद्दल कौतुक केले. 

High Court Demands Station Diary of Malbar Hill police station about Jayashree Patil Case : 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख