मुंबईच्या नालेसफाईत "हातसफाई', फडणविसांकडून पुन्हा शिवसेना लक्ष्य  - "Hand cleaning" in Mumbai's Nalesfai, Shiv Sena target again from Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईच्या नालेसफाईत "हातसफाई', फडणविसांकडून पुन्हा शिवसेना लक्ष्य 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

नालेसफाई पूर्ण झाली म्हणून सांगितले जाते, पण ती पूर्ण झालेली नाही.

मुंबई : ""मुंबईत केलेल्या नालेसफाईत 'हातसफाई' झाल्यामुळे पूरपरिस्थिती ओढवल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर केली, मुंबईत त्यांनी अनेक ठिकाणी पाहणी दौरा केल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. 

फडणवीस म्हणाले, "" बीएमसी कायमच नालेसफाई झाल्याचा दावा करते. यावेळी तर पालिका प्रशासनाने 113 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. मात्र ही हात सफाई आहे. नालेसफाई पूर्ण झाली म्हणून सांगितले जाते, पण ती पूर्ण झालेली नाही. यात हातसफाई झाली का,अशी शंका उपस्थित होते. दक्षिण मुंबईतही या वेळेला पाणी साठले आहे. आमच्या नेत्यांनीही महापालिकेला सांगितलं होतं की नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही. ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आणि पंम्पिंग स्टेशनचे प्रकल्प धीम्या गतीने चालू आहेत याला टॉप मोस्ट प्रायॉरिटी दिली नाही, तर मुंबईची परिस्थिती अशीच राहील. मी म्हणेन की 113 टक्के नालेसफाई ही फक्त सफाई आहे. ती कुठली सफाई हे तुमच्या लक्षात येते.'' 

मध्यंतरीच्या काळात मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यांच्यासह आमचे सर्व नेत्यांनी नाले सफाई कामाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्क करत नालेसफाई झाली नसल्याचे सांगितले होते. पम्पिंग स्टेशनचे प्रकल्प अत्यंत धीम्या गतीने सुरु आहेत. जोपर्यंत बीएमसी काम करणार नाही तोपर्यंत मुंबईची परिस्थिती हीच राहिल, असेही फडणवीस म्हणाले. 

फडणवीस म्हणाले,की दरवर्षी मुंबईमध्ये पाऊस पडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते ती सुधारलेली कुठेही दिसत नाही. काल ज्याप्रकारे मुंबईमध्ये पाणी जमा झाले आणि एनडीआरएफला लोकांना बाहेर काढावे लागले. ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. सातत्याने बीएमसीकडून आम्ही पम्पिंग स्टेशन बांधत असल्याचे सांगिले जाते. मात्र हे होताना दिसत नाही. त्याला गती मिळत नाही. कालच्या पावसात भिंत पडल्यामुळे कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु मागच्या वेळेला भिंत पडल्यामुळे जीवितहानी झाली होती. मुंबई महापालिकेने अशा धोकादायक ठिकाणांची यादी तयार केली होती. त्या यादीपैकी किती ठिकाणी उपाययोजना केल्या ते कोणालाही माहिती नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख