महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज  ः देवेंद्र फडणवीस - Government of Maharashtra The need for introspection: Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज  ः देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाकडून ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे.

मुंबई  ः सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश म्हणजे न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय आहे. या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणास आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाकडून ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी आम्ही यापूर्वीच मागणी करत होतो, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे, अशी बहुतांश भाजप नेत्यांची प्रतिक्रिया आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी थेट या प्रकरणी तपासात कोणाचा हस्तक्षेप होता असे सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही. सिंघमचा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण, सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नावलौकिक, ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही?

कुणी, मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात, पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. या प्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली, त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फडणवीस यांनी एक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे, त्यात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आता तरी सुशांतसिंह राजपूत प्रकरणास आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे, असा आशावाद त्यात त्यांनी व्यक्त केला आहे. 

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत राज्य सरकारवर टीका केली आहे. आता तरी ठाकरे सरकारची दादागिरी संपेल आणि सुशांतसिंह याच्या कुटुंबास न्याय मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख