GOOD DECISION एकनाथ शिंदे पोलीसांच्या मदतीला धावले, मुंबईत घरे राखीव  - GOOD DECISION Eknath Shinde rushed to the aid of police, houses reserved in Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

GOOD DECISION एकनाथ शिंदे पोलीसांच्या मदतीला धावले, मुंबईत घरे राखीव 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 जुलै 2020

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सिडकोच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांसाठी विशेष बाब म्हणून घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. 

मुंबई : राज्यात, विशेषत: मुंबई महानगर परिसरात पोलिसांच्या घरांचा प्रश्न बिकट आहे. गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काची घरे उपलब्ध होताना अडथळे येत आहेत.

परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलिसांसाठी राखीव घरे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून पोलिसांना साडेचार हजार घरे उपलब्ध झाली आहेत. 

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सिडकोच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांसाठी विशेष बाब म्हणून घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. 

या घरांच्या ऑनलाइन नोंदणीला उद्या, सोमवार 27 जुलैपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका विशेष ऑनलाइन सोहळ्यात या नोंदणीला सुरुवात होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जीतेंद्र आव्हाड, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. 

श्री. शिंदे यांनी नगरविकास खात्याचा कार्यभार हाती घेताच घेतलेल्या आढावा बैठकीत परवडणाऱ्या घरांच्या योजनांमध्ये पोलिसांसाठी देखील घरे राखीव ठेवण्याचे निर्देश दिले होते. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत सुरू असलेल्या प्रकल्पांमध्येही पोलिसांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय श्री. शिंदे यांनी घेतला होता. त्यानुसार, नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोड्‌समध्ये सुरू असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये एकूण 4466सदनिका पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व अल्प उत्पन्न गटासाठी या सदनिका उपलब्ध असून केवळ मुंबई महानगर कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी त्या राखीव आहेत. मासिक उत्पन्न 25हजार रुपयांपर्यंत आणि मासिक उत्पन्न 50 हजार रुपयांपर्यंत अशा दोन गटांमध्ये या सदनिका असून त्यांची किंमत किमान 19 लाख ते कमाल 31लाख रुपये इतकी आहे. 

27 जुलैपासून सुरू होणारी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया महिनाभर, म्हणजे 27 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे, तर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 28 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीत चालणार आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलिसांच्या घरांचा प्रश्न किती बिकट आहे, याची सर्वांनाच कल्पना आहे. नगरविकासमंत्री या नात्याने राज्यात परवडणाऱ्या घरांची निर्मिती करत असताना पोलिसांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. 

सेवा काळात सरकारी घरांमध्ये राहाणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांवर निवृत्तीनंतर बिकट परिस्थिती ओढवते. मुंबईत घर घेणे परवडत नाही. त्यामुळेच परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हक्काची घरे उपलब्ध होणार असल्यामुळे पोलिसांची मोठी चिंता दूर होईल, असेही ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख