बिहार समर्थक भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो  - Give pro-Bihar BJP leaders the strength to endure suffering | Politics Marathi News - Sarkarnama

बिहार समर्थक भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 16 ऑगस्ट 2020

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना या वर्षी एकही पदक मिळालेली नाही. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल 58 पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान करणाऱ्या आणि महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना मिळो, ही प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना,' अशी खोचक टीका  कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

मुंबई : "केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना या वर्षी एकही पदक मिळालेली नाही. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल 58 पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान करणाऱ्या आणि महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना मिळो, ही प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना,' अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

या सदंर्भात सावंत म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविण्याचा कृज्ञघ्नपणा महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी वारंवार केला आहे. 

मुंबई पोलिस सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास उत्तमरित्या करत असताना त्यांच्या तपासावर संशय घेणे, तपास सीबीआयला देण्याची मागणी करणे, तसेच पोलिस महासंचालकांना रजेवर पाठवा, अशी मागणी करणे, अशा पद्धतीने सातत्याने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवून एकप्रकारे त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम या मंडळींनी केले आहे आणि आजही करत आहेत. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकाऱ्यांना पदकं देऊन त्यांचा सन्मान करुन त्यांच्या कामावर विश्वास असल्याचेही दाखवून दिले आहे, ही राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मोठी चपराक आहे. 

मुंबई पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवत बिहार पोलिसांचा मात्र या लोकांना चांगलाच पुळका आलेला दिसत आहे. बिहार पोलिसांना सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करु द्या, त्यांच्या अधिकऱ्यांना क्वारंटाईन करणे अयोग्य आहे, असे गळे काढण्यात आले. बिहार पोलिस मुंबईत येऊन व बिहारचे डीजीपी माध्यमातून जाहिरपणे मुंबई पोलिसांचा अवमान करत होते, त्यावेळी महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांना आनंद होत होता. 

वास्तविक पाहता मुंबई पोलिस दल हे जगातील उत्तम पोलिस दलांपैकी एक आहे. याच मुंबई पोलिसांनी आतापर्यंत कठीणातील कठीण गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल, असे उत्तम काम केलेले आहे. 

मागील पाच वर्षे याच पोलिस दलाचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून काम पाहिले आणि सत्ता जाताच सहा-सात महिन्यांत त्याच पोलिसांवर त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांना विश्वास दाखवता येऊ नये, हे दुर्दैवी आहे, असेही सचिन सावंत म्हणाले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख