Gadkari says, "Crowds in big cities like Pune and Mumbai should be reduced! '' | Sarkarnama

गडकरी म्हणतात, "" पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातील गर्दी कमी झाली पाहिजे ! '' 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 जून 2020

मला भाषिक अथवा प्रांतिय राजकारण करायचे नसून मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी होणे आवश्‍यक आहे.

मुंबई : " मी महाराष्ट्रातील मराठी माणूस आहे. आता दिल्लीत असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. राज्यातील लोकसंख्येने गजबजलेल्या पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमधून भविष्यात गर्दी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. 

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गर्दी कमी होणे आवश्‍यक आहे. यासाठी मुंबई पुण्याबाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे असे मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे. 

तसेच मुंबई बाहेर क्‍लस्टर डेव्हलपमेंटचेही प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे मत ही त्यांनी मांडले आहे. ते शनिवारी 'झी २४ तास'च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे #e_conclave मध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,"" मला भाषिक अथवा प्रांतिय राजकारण करायचे नसून मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी होणे आवश्‍यक आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे संकट गंभीर बनले आहे .हे आपल्याला दिसतच आहे. त्यामुळे मुंबई बाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेज उभारणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्राकडे मोठी क्षमता असून कोरोनाच्या संकटानंतरही महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल. तसेच समुद्रात आणि नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याचे प्रमाणही कमी झाले पाहिजे.जेणेकरून पर्यटनासाठीही लोक येतील, असेही ते म्हणाले. 

भविष्यात पर्यावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलमिश्रित पेट्रोलवरील वाहने चालवण्यात यावी, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.  

मी महाराष्ट्रातील मराठी माणूस आहे. आता दिल्लीत असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. आज राज्याबाहेर असल्यामुळे मला मराठी संस्कृती किती मोठी आहे, हे लक्षात येतेय. मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही. कदाचित राज्याबाहेर आल्यावरच मराठी संस्कृतीचे मोठेपण समजते, असे उद्गार यावेळी नितीन गडकरी यांनी काढले.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख