माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची काँग्रेसमध्ये घुसमट! - Former Minister Chandrakant Handore Unhappy in Congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची काँग्रेसमध्ये घुसमट!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

दलित पॅंथर चळवळीपासून आंबेडकरी चळवळीत ते गेले ४५ वर्षांपासून सक्रिय आहेत. नगरसेवक ते मुंबई महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता आल्यावर रिपब्लिकन पक्षाने त्यांना प्रथमच महापौर बनविले. त्यानंतर हंडोरे यांनी रिपब्लिकन पक्षाला रामराम करून कॉंग्रेस पक्षाची कास धरली आणि प्रथम विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते

चेंबूर  : गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ कॉंग्रेस पक्षामध्ये सक्रिय असलेले माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याने नाराज हंडोरे समविचारी पक्षात जाणार की स्वतंत्र पक्ष उभारणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

दलित पॅंथर चळवळीपासून आंबेडकरी चळवळीत ते गेले ४५ वर्षांपासून सक्रिय आहेत. नगरसेवक ते मुंबई महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता आल्यावर रिपब्लिकन पक्षाने त्यांना प्रथमच महापौर बनविले. त्यानंतर हंडोरे यांनी रिपब्लिकन पक्षाला रामराम करून कॉंग्रेस पक्षाची कास धरली आणि प्रथम विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते. राज्यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांना कॉंग्रेसने सामाजिक न्यायमंत्री पदाची जबाबदारी दिली. 

गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने चेंबूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. परंतु दोन वेळा पराभव पत्करावा लागला. 'भीमशक्ती' वंचित, अत्याचाराने त्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करण्याचा विचार करीत आहोत. आपल्याला दलित चेहरा नसलेल्या पक्षांकडून सतत ऑफर येत आहेत,'' असे त्यांनी सांगितले; परंतु कॉंग्रेस सोडल्यानंतर कोणत्या पक्षासोबत जाणार याबाबत सांगण्यास हंडोरे यांनी टाळले.

कार्यकर्तेही संभ्रमात
कॉंग्रेस पक्षात असतानाच त्यांनी आपली स्वतःची ताकद निर्माण करण्याकरिता भीमशक्ती संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे जाळे त्यांनी राज्यभर पसरविले. गेल्या दहा वर्षांपासून कॉंग्रेस पक्षात दलित नेते असलेले हंडोरे यांना पक्ष सतत डावलत असल्याने ते नाराज आहेत. त्यांच्या भीमशक्ती संघटनेतील कार्यकर्त्यांना कोणत्याही महामंडळावर, विविध समित्यांमध्ये वाटा देत नसल्याने कार्यकर्तेही नाराज असल्याची चर्चा आहे. जर आपल्याला सतत पक्ष डावलत असेल तर या पक्षात राहून फायदा काय, असा प्रश्‍न त्यांच्यासह कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे नाराज हंडोरे कॉंग्रेसला रामराम करणार की स्वतंत्र पक्ष स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख