हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच पवारांनी लिहिले हे पहिले पत्र... - This is the first letter that Pawar wrote after being discharged from the hospital ... | Politics Marathi News - Sarkarnama

हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच पवारांनी लिहिले हे पहिले पत्र...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

डिस्चार्ज मिळताच पवार हे आपल्या नेहमीच्या स्टाइलने कामाला लागले आहेत.

मुंबई  ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच सर्वप्रथम राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात कोरोनाच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन, तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा, अशी सूचना केली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे आढळून आल्याने त्यांच्यावर ३० मार्च रोजी मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर बारा एप्रिल रोजी पित्ताशयावरील दुसरी शस्त्रक्रिया झाली होती. या दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर तपासणीसाठी रुग्णालयात गेल्यानंतर पवार यांच्या तोंडात अल्सर आढळून आला होता. तो काढण्यासाठी पवार २१ एप्रिल रोजी पुन्हा ब्रीच कॅंडीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर डिस्चार्ज मिळताच पवार हे आपल्या नेहमीच्या स्टाइलने कामाला लागले आहेत. त्यातूनच त्यांनी कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या कोरोनायोद्धांच्या कुटुंबांना मदत करण्याची सूचना पक्षाला केली आहे. 

कोरोनोच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कोषाध्यक्ष हेमंत टकले यांना दिल्या. दिरंगाई न होता तातडीने ही मदत मिळावी, यासाठी शरद पवार यांनी एका कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात या सूचना लिहून पाठवल्या आहेत. 

रुग्णालयात असतानाही शरद पवार हे सातत्याने राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सचा तुटवडा असो किंवा लसीकरणातली अडचणीची परिस्थिती असो वा ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधात निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती. रुग्णालयात असतानाही शरद पवार हे रोज परिस्थितीचं अवलोकन करत होते. नव्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्याच्या तिजोरीवर पडलेला ताण पवार यांच्या ध्यानात आला आणि त्यांनी रुग्णालयातून घरी परतल्यावर पक्ष सहकाऱ्यांना तातडीने मदत निधीसंबंधीच्या सूचना दिल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख