Fadnavis says, "Let's take the initiative as an opposition party to raise tribal issues with the Governor!" | Sarkarnama

फडणवीस म्हणतात, "" आदिवासींचे प्रश्न राज्यपालांकडे मांडण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून पुढाकार घेऊ !''

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

अन्नधान्यासारख्या प्राथमिक बाबींसाठी आदिवासींना रस्त्यावर उतरावे लागले, हे खरोखरच दुर्दैवी आहे असे त्यांनी म्हटले आहे. 

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे फायरब्रॅंड नेते देवेंद्र फडणवीस हे ठाकरे सरकारला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांनी आता आदिवासी बांधवावर प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

अन्नधान्यासारख्या प्राथमिक बाबींसाठी आदिवासींना रस्त्यावर उतरावे लागले, हे खरोखरच दुर्दैवी आहे असे त्यांनी म्हटले आहे. 

विवेक पंडित हे ठाणे जिल्ह्यातील श्रमजिवी संघटनेचे सर्वेसर्वा आहेत. त्यांचा राजकीय प्रवासही थक्क करणारा आहे. प्रारंभी ते समाजवादी विचारसरणीशी एकरूप होते. पुढे त्यांनी श्रमजिवी संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. वसई-विरारमधील कुविख्यात गुंड भाई ठाकूर आणि त्यांचे बंधू हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीविरोधात रणशिंग फुंकले होते.

ते एकदा आमदार म्हणूनही निवडून आले होते. ठाकूर कंपनीशी त्यांचा विरोध हा जगजाहीर आहे. मात्र शिवसेनेतही ते फार काळ टिकू शकले नाहीत. सध्या ते भाजपच्या जवळचे समजले जातात. 

ठाणे आणि पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या बालेकिल्ल्यात शिवसेनेशी युती केल्यास चांगले दिवस येतील असे समजून त्यांनी शिवसेनेसोबत आघाडी केली पण, शिवसेना आणि श्रमजिवी संघटनेचे फारसे जमले नाही. राज्यात फडणविसांचे सरकार येताच त्यांनी भाजपची सोबत केली. 

कोरोनाच्या संकटात श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी बेमुदत अन्न सत्याग्रह कालपासून सुरू करण्यात आला. आज त्या आंदोलनस्थळी भेट देऊन, फडणविस यांनी पाठिंबा दर्शविला. अन्नधान्यासारख्या प्राथमिक बाबींसाठी आदिवासींना रस्त्यावर उतरावे लागले, हे खरोखरच दुर्दैवी आहे. 

उच्च न्यायालयाने स्पष्ट दिशानिर्देश दिल्यानंतर सुद्धा राज्य सरकारच्या वतीने त्यांना अन्नधान्य मिळत नसल्याने प्रचंड अडचणीच्या स्थितीला सामोरे जावे लागते आहे. माझी राज्य सरकारला पुन्हा विनंती आहे की, आदिवासी बांधवांच्या न्याय मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे! असेही फडणविस यांनी म्हटले आहे. 

हे सर्व प्रश्न सरकारदरबारी, प्रसंगी राज्यपालांकडे मांडण्यासाठी आम्ही विरोधी पक्ष म्हणून पुढाकार घेऊ, असे अभिवचन दिले. सोबतच, सरकारने समिती गठीत केली असल्याने आता हे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती सुद्धा विवेक पंडितजी आणि अन्य नेत्यांना त्यांनी केली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख