Face Mask in Public Places Must for Mumbaikars | Sarkarnama

मुंबईकरांनो, फक्त घरातच फिरता येईल मास्कविना

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेक नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याचे दिसून आल्याने मुंबई महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत

मुंबई  : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक आहे; मात्र कार्यालये आणि वाहनांमधील प्रवासी मास्क वापरताना दिसत नाहीत. मुंबई महापालिका आता त्यांच्यावर कारवाई करणार आहे. विना मास्क फिरताना आढळल्यास एक हजार रुपयांचा दंड महापालिका करणार आहे. 

१३ मार्चला मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले; मात्र खासगी वाहनांमध्ये बसलेले प्रवासी मास्क वापरत नसल्याचे सर्रास दिसून येते  आहे. त्याचबरोबर आता कार्यालयेही काही प्रमाणात सुरू झाली आहेत. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अधिक शिथिल करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान खासगी वाहनांमध्ये बसलेल्यांनाही मास्क वापरणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  तसेच कार्यालयांमध्ये वावरतानाही मास्क वापरणे बंधनकारक आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेक नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याचे दिसून आल्याने मुंबई महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी हे  आदेश दिले आहेत. पोलिसांबरोबरच महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांनाही एक हजार रुपये दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

नियम कोणासाठी?
- कार्यालयीन वापराची वाहने तसेच खासगी वाहनांमध्येही मास्क लावणे बंधनकारक
- कार्यालये, दुकाने, रस्ते, दवाखाने, बाजार, रुग्णालये यांसारखी सार्वजनिक ठिकाणे
- बैठकीसाठी एकत्र येताना मास्क वापरणे बंधनकारक
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख