मोठी बातमी : राज्यातल्या १३ विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होणार!  - Examinations of 13 universities in the state will be online | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : राज्यातल्या १३ विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होणार! 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून कोरोनासंदर्भात कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून कोरोनासंदर्भात कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षांचे नियोजन देखील काहीसे विस्कळीत होण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. उद्यापासून राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमधल्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. 

आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना दोन पर्याय देण्यात आले होते. त्यामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे पर्याय होते. विद्यापीठांना त्यासंदर्भातील निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यास सुरूवात केली होती. मात्र, आता सर्व १३ अकृषी विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

नवे आदेश : कार्यालयांत १५ टक्के उपस्थिती, जिल्हा प्रवासावर मर्यादा, लग्न समारंभास दोन तासांची परवानगी

कोरोनाच्या परिस्थितीमुळे आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते निर्णय घेतलाय की महाराष्ट्रातल्या सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील. या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती मी कुलगुरुंना केली आहे. या परीक्षांमधून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे'', असेही सामंत म्हणाले.  

हा निर्णय उद्यापासूनच लागू करण्यात येईल, सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा सुरू आहेत. काही ठिकाणी ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. पण उद्यापासून त्या शक्य नसल्यामुळे सर्वच कुलगुरुंनी सरकारला विनंती केली होती. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. विधी, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. प्राध्यापक भरती कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले. 

सोलापूरच्या पालकमंत्र्यांचा बोलण्यातील गोडवा कामात दिसेना!
 

18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या 84 लाख इतकी आहे. या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांना लसीकरण करता येईल यासाठी प्लॅन तयार करण्यात येणार आहे.   त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी कमी होण्यास मदत होईल. येत्या 2 दिवसांत राज्यपालांची भेट घेत त्यांना माहिती देणार आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जाणाऱ्यांची RTPCR टेस्ट केली जात आहे. कोकणात ऑक्सिजन प्लँट असल्याने तुटवडा जाणवत नसल्याचे सामंत यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख