चिपळूण : संभाजी महाराजांचा जन्म पुण्यात झाला. पुण्यात त्यांचे स्मारकही आहे. त्यामुळे औरंगाबादऐवजी पुणे जिल्ह्याला संभाजीनगर, असे नाव देण्यात यावे. औरंगाबादचे नाव बदलायचेच असेल तर तेथील स्थानिक लोकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते माजी खासदार हुसैन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपला विकास करता येत नाही, म्हणून ते नावाचे राजकारण करतात. भाजपच्या राजकारणाला बळी न पडण्याची मागणीही दलवाई यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''औरंगाबाद हे शहर मलिक अंबर नावाच्या राजाने वसविले. नंतर त्यावर औरंगजेबाने राज्य केले. औरंगजेबाने मंदिरे तोडल्याचा इतिहास सांगितला जातो. पण औरंगजेबाने स्थानिक पातळीवर मंदिरे बांधण्यासाठी आर्थिक मदत केली, जागा दिली, हिंदू धर्मातील लोकांनाही न्याय दिला, याचे पुरावे आहेत. पण त्याबाबत कोणीच काही बोलत नाही. औरंगाबादमध्ये औरंगजेबाचे स्मारक आहे. तेथील अनेक सार्वजनिक ठिकाणे त्याच्या नावाने ओळखल्या जातात. त्यामुळे मुस्लिम समाजाची औरंगाबाद या नावाशी नाळ जुळलेली आहे. निव्वळ राजकारण म्हणून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करून विशिष्ठ समाजाला दुखावण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. देशातील अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केले जात आहे," पुणे जिल्ह्याचे संभाजीनगर नाव करावे, ही केवळ माझी किंवा कॉंग्रेसची मागणी नाही तर संभाजी ब्रिगेडसह इतर संस्थांनीही याबाबत वारंवार मागणी केली आहे. त्याचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, अशी मागणी दलवाई यांनी केली.
आर्थिक घडी मोदींनी विस्कटली
कोट्यवधी तरुण बेरोजगार होत आहेत. केंद्र सरकार आणि भाजपविरोधी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. देशातील पंडित, नेहरुंपासून निर्माण झालेली आर्थिक घडी मोदींनी विस्कटून टाकली आहे. अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे सोडा, ती ७.५ टक्क्यांवर घसरली आहे. नवीन उद्योग येत नाहीत, या सर्व प्रश्नांतून जनतेचे लक्ष वेगळ्या प्रश्नांकडे नेण्यासाठी अतिशय घातक प्रश्न निर्माण केले जात आहेत.
जातीच्या राजकारणाला खतपाणी..
औरंगाबादचे संभाजीनगर करावे, अशी पहिली मागणी शिवसेनेची असली तरी आता शिवसेना कॉंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सत्तेत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमानुसार चालत आहे. मुस्लिम समाजानेही या सरकारला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही, असे भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच भाजप जातीच्या राजकारणाला खतपाणी घालत आहे.
Edited By- Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.