मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. यापूर्वी १९ नोव्हेंबर रोजी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती खडसेंनी दिली होती. पण त्यावेळी दोन दिवसांनंतर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 18, 2021
''माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो,'' असे ट्वीट आज खडसे यांनी केले आहे. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा कोरोना रिपोर्ट १७ नोव्हेंबरला पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर नाथाभाऊ यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले होते, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा खानदेशचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला होता. माजी मंत्री खडसे यांची अँटिजेन आणि आरटीफीसीआर या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र, सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांचे अहवाल तपासणी करण्यात आली त्यांचा अहवाल निगेटिव्ह मार्किंग आल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.आता ते मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
३१ डिसेंबर रोजी पुन्हा त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. त्यांनी त्यावेळीही स्वत: ट्वीट करत खडसे यांनी याबाबत माहिती दिली होती. यावेळी त्यांनी प्रसिद्धीपत्रकही जारी केले होते. नेमक्या त्याच कालावधीत त्यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांनी ईडीकडून तारीख वाढवण्याची मागणी केली. ईडीने ती मागणी मान्य केली होती.
Edited By - Amit Golwalkar

