जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. पुण्यातील भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणी त्यांना आज (बुधवार, 30 डिसेंबर) मुंबईत चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहतात किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे.
एकनाथ खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ते ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहतील किंवा नाही? याबाबत साशंकता आहे. मात्र, खडसे यांच्यावतीने त्यांचे वकिल ईडी कार्यालयात जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
महिनाभरापूर्वी झाली होती कोरोनाची लागण
एकनाथ खडसे सध्या मुंबईत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर देखील आहेत. दरम्यान, एक महिन्यांपूर्वी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे.
भोसरी एमआयडीसीतील भूखंडाचे आहे प्रकरण-
एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ईडीने चौकशीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधी देखील याच प्रकरणी खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभाग तसेच झोटिंग समितीने चौकशी झाली होती. आता याच प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे.
Edited By - Amit Golwalkar

