Eighteen Seats in Maharasthra Legislative Council Vacant | Sarkarnama

विधान परिषदेतील १८ जागा रिक्त

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 जुलै 2020

विधान परिषदेतील आणखी चार सदस्यांची मुदत १९ जुलै रोजी संपली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रत्येकी दोन सदस्य निवृत्त झाले असल्याने सभागृहातील रिक्त जागांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे.

मुंबई : विधान परिषदेतील आणखी चार सदस्यांची मुदत १९ जुलै रोजी संपली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रत्येकी दोन सदस्य निवृत्त झाले असल्याने सभागृहातील रिक्त जागांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे.

विधान परिषदेत नागपूर, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनुक्रमे अनिल सोले (भाजप), सतीश चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस), तसेच पुणे शिक्षक मतदारसंघाचे दत्तात्रय सावंत आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाचे श्रीकांत देशपांडे यांची मुदत १९ जुलैला संपली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे चंद्रकांत पाटील विधानसभेवर निवडून आल्याने गेल्या नऊ महिन्यांपासून ही जागा रिक्त आहे. या रिक्त जागेची मुदतही संपली आहे. 

विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त १२ सदस्यांची मुदत गेल्या महिन्यात संपली. त्यामुळे १२ जागांसह विधान परिषदेत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच आणि धुळे-नंदूरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची एक अशा एकूण १८ जागा रिक्त झाल्या आहेत. दरम्यान, राज्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. धुळे-नंदूरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक ३० मार्च रोजी होणार होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयोगाने ही निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख