कोरोना काळात आंदोलने नको; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन - Dont make Agitations CM Uddhav Thackeray Appeals to Maratha Community | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना काळात आंदोलने नको; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार या समाजाच्या बरोबर आहे. आम्ही सर्व ते प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळात आंदोलने करु नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याबाबत कुणीही गैरसमज पसरवू नये, असेही आवाहन त्यांनी केले

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार या समाजाच्या बरोबर आहे. आम्ही सर्व ते प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळात आंदोलने करु नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याबाबत कुणीही गैरसमज पसरवू नये, असेही आवाहन त्यांनी केले.

ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मिडियावरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, "हा विषय अशा पद्धतीने येण्याची आवश्यकता नव्हती. गेल्या वेळी विधीमंडळातल्या सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला. त्यावेळी आम्ही भाजपबरोबर सत्तेत होतो. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात होते. आज चित्र बदलले असले तरी सर्व पक्ष मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकाच मताचे आहेत,''

ठाकरे पुढे म्हणाले, "सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर  उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. तिथे आपण जिंकलो. पहिल्या सरकारने त्यावेळी दिलेले वकिल आपण बदलेले नाहीत. उलट त्यात वाढ केली आहे. सर्वोत्तम वकिल दिले आहेत. काही संस्था - व्यक्तींनी आपल्या पसंतीचे वकिल दिले आहेत. हे सर्वजण आपापल्या पद्धतीने बाजू मांडत आहेत. न्यायालयात युक्तीवाद करायला आपण कमी पडलेलो नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र मोठ्या बेंचसमोर जायला परवानगी दिली आहे, ही लढाई आपण नक्की जिंकू,"

मी स्वतः व्हिडिओ माध्यमातून अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अजित पवार, जयंत पाटील यांच्याशी या बाबत चर्चा केली आहे. हे नेतेही विविध संस्थांशी चर्चा केली आहेत. सर्वांची मते लक्षात घेऊन काय गाऱ्हाणे मांडायचे, कसे मांडायचे हे आम्ही ठरवतो आहोत. मी विरोधी पक्षनेत्यांशीशी बोललो आहे. ते बिहारमध्ये आहेत. त्यांनी सांगितले आहे की आम्ही सरकारसोबत आहोत,'' असेही ठाकरे म्हणाले. 

''तुमच्या भावना व आमच्या भावना वेगळ्या नाहीत. जर सरकार दाद देत नसेल तर आंदोलने जरुर करा. पण तशी स्थिती नाही. त्यामुळे कशासाठी रस्त्यावर उतरायचे? राज्य सरकार तुमची बाजू चिकाटीने, जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि आक्रमकपणे न्यायालयात मांडते आहे.  आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांशी बोलून रोडमॅप निश्चित करत आहोत. सरकार आपल्या सोबत आहे. सरकारने निर्णय घेतला आहे. कृपया कोरोनाच्या संकटात आंदोलने मोर्चे काढू नका, तुम्हाला न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे, कुणी गैरसमज पसरवू नये,'' असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख