मुंबई पालिका निवडणुकीबाबत आघाडीत मत-मतांतरे - Diffrence of Opinion in Maha Vikas Aghadi About Mumbai Elections | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई पालिका निवडणुकीबाबत आघाडीत मत-मतांतरे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 डिसेंबर 2020

मुंबई महापालिका निवडणुका लढण्यावर महाविकास आघाडीत आतापासूनच मत-मतांतरे सुरू झाली आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी पालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची भूमिका कायम ठेवली आहे; तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महायुतीतर्फे निवडणूक लढण्याची भूमिका मांडली जात आहे.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका लढण्यावर महाविकास आघाडीत आतापासूनच मत-मतांतरे सुरू झाली आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी पालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची भूमिका कायम ठेवली आहे; तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महायुतीतर्फे निवडणूक लढण्याची भूमिका मांडली जात आहे.

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी, अशी मुंबई कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. ही भूमिका त्यांनी दिल्लीतील नेत्यांपुढेही मांडली आहे. मुंबई कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनीही काल ही भूमिका मांडली. यापूर्वी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पक्ष तसेच आरपीआयच्या काही गटांची आघाडी होती; पण महापालिका निवडणूक कॉंग्रेस स्वतंत्र लढत होती. त्याचा आघाडीवर कोणताही परिणाम होत नव्हता. 

कॉंग्रेसने २२७ जागा लढवल्या आहेत. त्या आताही लढवेल. त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कॉंग्रेसने पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार सुरू केलेला असताना शिवसेना, राष्ट्रवादीकडून महायुतीचा सूर आळवला जात आहे; तर आमची भूमिका सोबत लढण्याची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसेच सांगितले आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

महायुतीचे वरिष्ठ नेते प्रगल्भ आहेत. त्यांना विरोधकांचा अंदाज असल्याने ते योग्य निर्णय घेतील; पण मला आजही खात्री वाटते, ही निवडणूक महाआघाडी सर्व पक्ष सोबत लढतील - किशोरी पेडणेकर, महापौर

काही नेते स्वतंत्र लढण्याची भूमिका मांडत आहे; पण कॉंग्रेसने अद्याप अधिकृत भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे हे काही नेत्यांचे वैयक्तिक मत असू शकेल - नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री.

Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख