मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. मुंडे यांचे मेव्हणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. २०१९ पासून तीन जण आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
दुसरीकडे "सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपी करणारी महिला आपल्यालाही गेली दहा वर्षांपासून ब्लॅकमेल करीत होती,' असा आरोप करून भारतीय जनता पक्षाचे नेते कृष्णा हेगडे यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना तोंडावर पाडले आहे. कारण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या व इतर नेत्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सावध भूमिका घेतली होती. आता हेगडे यांच्या या आरोपानंतर हे भाजप नेते काय भूमिका घेणार, याकडे लक्ष असणार आहे.
मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मुंडे यांच्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक बैठकही घेतली होती. मात्र, हेगडे यांच्या आरोपानंतर या प्रकरणात मुंडे यांच्या विरोधातील आरोपाची धार काहीसी बोथट झाली आहे. "संबंधित महिला ही मला 2010 पासून संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत होती. वेगवेगळ्या नंबरवरून मला फोन आणि व्हॉट्स ऍप मेसेज करायची. हे हनिट्रॅपचे प्रकरण आहे, हे लक्षात आल्यानंतर तिला टाळण्याचा प्रयत्न केला. पण, ती पाच ते सहा वर्षे माझा पिच्छा पुरवत होती. पण मी तिला दूर ठेवले,'' असा दावा भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.