ठाकरे - मोदी भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात... - Devendra Fadnavis says about the meeting between Uddhav Thackeray and Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे - मोदी भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 जून 2021

भेट झाली असेल तर मी त्याचे स्वागतच करतो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोघांची वैयक्तीक भेट झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की, पंतप्रधानांकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एखादं शिष्टमंडळ जातं. तेव्हा शिष्टमंडळाच्या भेटीनंतर वन टू वन मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट ही नियमितपणे होते, त्यामुळे अशी बैठक झाली असेल तर त्याचा राज्याला फायदाच होईल आणि राज्याच्या हिताची बैठक असेल. पण, त्या दोघांमध्ये बैठक झाली की नाही, हे मात्र मला माहीत नाही. झाली असेल तर मी त्याचे स्वागतच करतो, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर भाष्य केले. (Devendra Fadnavis says about the meeting between Uddhav Thackeray and Narendra Modi)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणासह विविध बारा विषयांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदी-ठाकरे यांच्यात अर्धा तास वैयक्तीक भेट झाली. त्यावर फडणवीस बोलत होते.

हेही वाचा : विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त १२ सदस्य हे पंतप्रधान ठरवत नाहीत

 
मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये वैयक्तिक अर्धा तास बैठक झाली. त्यानंतर ‘आम्ही सत्तेत एकत्र नसलो, तरी आमच्यात मैत्री कायम आहे,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत, त्याबाबत फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे यांचे हे अत्यंत सकारात्मक विधान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वेगळ्या प्रकारचे संबंध राहिले आहेत. त्या दोघांमध्ये फार जवळीकही राहिली आहे. आम्हीदेखील हे नेहमीच सांगतो की आम्ही राजकीयदृष्टया वेगळे झालो आहोत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या टोकाचा संघर्ष करू. पण, त्याचा वैयक्तीक संबंधांवर फारसा परिणाम होत नाही.

शिष्टमंडळाने केलेल्या मागणीबाबत फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने केंद्र सरकारशी संवाद सुरू केला आहे, याचा आम्हाला आनंद आहे. या भेटीत सुमारे ११ विषय पंतप्रधानांकडे मांडल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आले आहे. यातील ८ ते ९ विषय हे राज्याच्या अख्यातरीतील आहे. केंद्र सरकारकडून आणखी मदत हवी असेल म्हणून ते राज्य सरकारने पंतप्रधानांकडे मांडले असतील.

ती मागणी पंतप्रधानांकडे करणे योग्य नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जी मागणी केली आहे, ती थोडीशी विचित्र वाटते आहे. कारण, त्याचा पंतप्रधानांशी काहीही संबंध येत नाही. राज्यपाल नियुक्त बारा सदस्य हे पंतप्रधान ठरवत नाहीत. ते कोणती पार्टीही ठरवत नाही. ते राज्यपाल ठरवतात, त्यामुळे त्याबाबतची मागणी पंतप्रधानांकडे करणे योग्य नाही. पण ठीक आहे. आता सरकारला ती करावीशी वाटली आणि त्यांनी ती केली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान-मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाच्या भेटीवर दिली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख