शिवसेनेकडून आणिबाणीच्या मानसिकतेचे प्रदर्शन : देवेंद्र फडणवीसांची टीका - Devendra Fadanaivs Criticizes Shivsena over Arnab Goswami Arrest | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेकडून आणिबाणीच्या मानसिकतेचे प्रदर्शन : देवेंद्र फडणवीसांची टीका

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी पोलिसांनी अटक करुन अलिबागला नेले आहे. या अटकेबाबत फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई : आणिबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक.अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी पोलिसांनी अटक करुन अलिबागला नेले आहे. इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. या अटकेबाबत फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

चंद्रकांत पाटील यांनीही केली टीका

''भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस 2018 सालीच बंद झाली होती ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो,'' अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मी महाराष्ट्रातील जनतेला आणि आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण आपल्या पद्धतीने राज्य  सरकारचा आंदोलन करून विरोध करा - उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा. काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे की हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात.. महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख