पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदासोबतच मंत्रिपद देण्याच्या चर्चेने कॉंग्रेसमध्ये वाद  - Debate in Congress over Nana Patole's appointment as state president and minister | Politics Marathi News - Sarkarnama

पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदासोबतच मंत्रिपद देण्याच्या चर्चेने कॉंग्रेसमध्ये वाद 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

आम्हाला वेगळा न्याय आणि नाना पटोले यांना वेगळा न्याय हा काय प्रकार आहे, अशी बोलणी सुरू झाली आहेत. 

मुंबई : शेतकरी नेते नाना पटोले यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांच्या नियुक्तीला विरोध सुरू झाला आहे. 

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी नाना पटोले यांना मंत्रिपदाचे आश्‍वासन मिळाले असल्याची चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष व्हायचे असेल, तर राजीनामा द्यावा लागेल, अशी अट श्रेष्ठींनी घातली होती. त्यामुळे आम्हाला वेगळा न्याय आणि नाना पटोले यांना वेगळा न्याय हा काय प्रकार आहे, अशी बोलणी सुरू झाली आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय वडेट्टीवार, डॉ. नितीन राऊत व के. सी. पडवी यांनी मंत्रिपद सोडून देण्यास असमर्थता दर्शवली होती. बाळासाहेब थोरात यांचे प्रदेशाध्यक्षपदही ते मंत्री असल्यानेच काढून घेण्यात आले आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रिपदही देण्यात येणार असल्याच्या चर्चेने कॉंग्रेस पक्षात अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पटोले यांना फक्त प्रदेशाध्यक्षपदच मिळते की त्याच्या जोडीने मंत्रिपदही मिळते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

अमिन पटेल यांचे नाव आघाडीवर 

राजीनाम्यामुळे रिक्त झालेले विधानसभेचे अध्यक्षपद आपल्याकडेच राखण्यावर कॉंग्रेस ठाम असेल असे समजते. त्या पदासाठी अमिन पटेल, के. सी. पडवी आणि यशोमती ठाकूर या नावांची चर्चा आहे. आमदार संग्राम थोपटे व सुरेश वरपूडकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. यशोमती ठाकूर आणि के. सी. पडवी हे मंत्री असल्याने मुंबईतील ज्येष्ठ नेते अमिन पटेल यांचे नाव आघाडीवर जाण्याची शक्‍यता आहे. 

संग्राम थोपटे दिल्लीत 

आमदार संग्राम थोपटे आज सायंकाळी दिल्लीत दाखल झाले आहेत. अनंतराव थोपटे आणि त्यांनी राखलेली पक्षनिष्ठा तसेच तरुण पिढीला संधी देण्याची गरज हे मुद्दे थोपटे यांच्या बाजूचे आहेत. जनतेच्या भल्यासाठी तसेच राज्याच्या भविष्याला वळण देण्यासाठी पदावर नियुक्ती आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख