मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नस्तीमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून चौकशीचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केल्यानंतर नस्तीतील शेरा बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मंत्रालयामध्येच ही बाब झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणानंतर मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात फसवणूक आणि फेरफारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधीक्षक अभियंत्याच्या विभागीय चौकशीची नस्ती मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वाक्षरी केली. मात्र, याच नस्तीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांच्या स्वाक्षरीच्या वर लाल शाईने "चौकशी बंद केली पाहिजे,' असा बनावट शेरा लिहिला होता. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी ही बाब मंत्री अशोक चव्हाण यांच्या कानावर घातली. त्यानंतर मंत्री चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्याचे आदेश दिले.
संबंधित प्रकरण हे भाजप सत्तेत असताना सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक अभियंत्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली होती. जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या इमारतीच्या बांधकामामध्ये अनियमितता झाल्याच्या आरोपानंतर चौकशी सरू करण्यात आली होती. त्यासंदर्भातील हे प्रकरण असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा शेरा बदलणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार (एफआयआर) नोंद करण्यात आली आहे. त्याबाबत चौकशी सुरू केली आहे.
- शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त
सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याच्या चौकशीची नस्ती मुख्यमंत्री कार्यालयाकडून परत आल्यावर हा प्रकार लक्षात आला. संबंधित बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्यानंतर त्याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

