बाजार समित्यांना डावलणारा कायदा कॉंग्रेसकडून १५ वर्षांपूर्वीच संमत : भातखळकर - Congress Passed act about AMPC Fifteen Years Back Allege Atul Bhatkhalkar | Politics Marathi News - Sarkarnama

बाजार समित्यांना डावलणारा कायदा कॉंग्रेसकडून १५ वर्षांपूर्वीच संमत : भातखळकर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

कंत्राटी शेतीला संमती देणारा आणि बाजार समित्यांबाहेर (एपीएमसी) शेतीमाल विक्रीस संमती देणारा कायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात 2005 मध्येच संमत केला आहे. आता फक्त स्वतःच्या कार्यकर्त्यांची दलालीची दुकानदारी बंद होणार असल्याने त्यांचा संताप होत असल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई  : कंत्राटी शेतीला संमती देणारा आणि बाजार समित्यांबाहेर (एपीएमसी) शेतीमाल विक्रीस संमती देणारा कायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात 2005 मध्येच संमत केला आहे. आता फक्त स्वतःच्या कार्यकर्त्यांची दलालीची दुकानदारी बंद होणार असल्याने त्यांचा संताप होत असल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात कॉंग्रेस पक्ष देशात ठिकठिकाणी आंदोलने करीत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने राज्यातही याविरोधात आंदोलने करण्याचे जाहीर केले आहे. त्याला भातखळकर यांनी वरीलप्रमाणे प्रत्युत्तर दिले आहे. शेती विधेयकावरून अनावश्‍यक गदारोळ करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा उघड झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

कंत्राटी शेतीबद्दल कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आता आरडाओरड करीत आहेत; मात्र त्यांच्याच पक्षाच्या मनमोहन सिंह यांनी 2005 मध्येच यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्र्यांची समिती नेमून अहवाल मागवला होता. त्याच अहवालाच्या आधारे कंत्राटी शेती व शेतमालाला खुली बाजारपेठ उपलब्ध करण्याचे कायदे सर्व राज्यांनी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जुलै 2006 मध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यांनी असे कायदे केले होते. महाराष्ट्रातही कंत्राटी शेती व बाजार समित्यांच्या बाहेर शेतमाल विकण्याची मुभा देणारे कायदे करण्यात आले होते, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या तेव्हाच्या कायद्यात दलाली घेण्याची मुभा होती, पण आता नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कायद्यात कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा दलाली देण्याची अट नाही. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मक्तेदारी झालेल्या बाजार समित्या व अडत्यांना आपली दलाली घेण्याची दुकानदारी बंद करावी लागणार आहे, त्यामुळेच कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते आंदोलन करीत असल्याची टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांसमोर दिखावा करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांचा खरा चेहरा आता देशासमोर उघडा पडला आहे, असा टोलासुद्धा त्यांनी लगावला आहे.

शेतकऱ्यांचा पुळका दाखवण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारने शेतीविषयक सुधारणांसाठी 5 जून 2020 रोजी काढलेल्या वटहुकुमाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने 10 ऑगस्टलाच अधिसूचना काढली होती, पण दुसरीकडे शेतकऱ्यांचा पुळका असल्याचे दाखवण्यासाठी या विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरू करायचे, यातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा उघड झाला आहे, अशी टीकाही अतुल भातखळकर यांनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख