काँग्रेसचे मंत्री उद्या दिल्लीत; प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय ठरणार? - Congress Ministers Meeting tomorrow at New Delhi | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचे मंत्री उद्या दिल्लीत; प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय ठरणार?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडींना आता वेग आला असून उद्या काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु आहेत. त्याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे

मुंबई : काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडींना आता वेग आला असून उद्या काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु आहेत. त्याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. त्याबाबतही महाराष्ट्रात काय भूमिका घ्यावी, यावरही या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.

राज्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात चार हजारांहून अधिक ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्याचा दावा विद्यमान प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता. उद्याच्या बैठकीत या निवडणुकांच्या निकालाचा आढावाही घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजिनामा देणार असल्याची चर्चा आहे. विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचे नांव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. 

प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात  पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या प्रमुख नेत्यांबरोबर याबाबत चर्चा केली होती. पाटील यांनी काँग्रेसच्या आमदारांशीही चर्चा केली होती. त्यावेळी अनेक आमदारांनी बाळासाहेब थोरात यांनाच प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे, अशी आग्रही मागणी केली. मात्र, विदर्भातील आमदारांनी पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी भूमिका घेतली होती. आता प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल काय निर्णय घेतला जातो, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

काँग्रेस पक्षात सध्या अस्वस्थता आहे. काही महिन्यांपूर्वी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्र पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले होते. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली कपिल सिब्बल, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. या पत्राने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यानंतर पक्षाची तातडीची बैठक घेऊन या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. या नेत्यांचे समाधान झाल्याचा दावा अन्य नेत्यांकडून करण्यात आला होता. पण त्यानंतरही पक्ष नेतृत्वामध्ये बदल झाला नाही. काही नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यावरच विश्वास व्यक्त केला. तर एका गटाने राहुल गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करण्याबाबत मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता जून महिन्यात काँग्रेसचा अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक होणार आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख