Congress Minister Ashok Chavan Unhappy in Alliance | Sarkarnama

आता अशोक चव्हाण झाले नाराज!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 जुलै 2020

महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे आलबेल असल्याचा दावा शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वारंवार करत असले तरीही वस्तुस्थिती तशी नाही हे अनेकदा समोर आले आहे. यापूर्वी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरुन, आमदारांच्या निधीवरुन आणि आमदारांची कामे होत नसल्याच्या कारणावरून महाविकास आघाडीतल्या कुरबूरी समोर आल्या आहेत.

मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडातील नाराजी नाट्य अधूनमधून डोके वर काढते. विशेषतः काँग्रेसचे मंत्री नाराज आहेत, हे अनेकदा समोर येते आहे. आता त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भर पडली आहे. खात्याच्या विभाजनावरुन चव्हाण नाराज असून त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे आलबेल असल्याचा दावा शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वारंवार करत असले तरीही वस्तुस्थिती तशी नाही हे अनेकदा समोर आले आहे. यापूर्वी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरुन, आमदारांच्या निधीवरुन आणि आमदारांची कामे होत नसल्याच्या कारणावरून महाविकास आघाडीतल्या कुरबूरी समोर आल्या आहेत. 

अशोक चव्हाण यांना न विचारता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी मांडल्याने चव्हाण संतापले आहेत. अधिकारी संबंधित मंत्र्यांना गृहीत धरत परस्पर प्रस्ताव देतात, असा चव्हाण यांचा आक्षेप आहे. या भावना चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडेही व्यक्त केल्या आहेत. काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतही याबाबत जोरदार चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती आहे. 

दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी नाराज आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नाना पटोले, नितीन राऊत, सुनील केदार आदी या बैठकीस उपस्थित होते. महाआघाडीचे सरकार असताना काँग्रेसला मात्र निर्णय घेता येत नाहीत असा आक्षेप काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी नोंदवला होता. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त केली होती. या नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची बैठक घेऊन आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. मुख्यमंत्री कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या बदल्यांवरही काँग्रेस नेत्यांचे आक्षेप होते. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांची नाराजी समोर आली आहे. 

अशोक चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये काँग्रेसला योग्य ते स्थान मिळत नाही, असा आक्षेप या आधी चव्हाण यांनी नोंदवला होता. तिन्ही पक्षांना समान अधिकार असायला हवेत, हा मुद्दा घेऊन चव्हाण व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख