काँग्रेसच्या नेत्यांना शिवसेनेच्या प्रमाणपत्राची गरज नाही : नाना पटोले - Congress leaders do not need Shiv Sena certificate : Nana Patole | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या नेत्यांना शिवसेनेच्या प्रमाणपत्राची गरज नाही : नाना पटोले

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

कारण, मी सामना वाचतच नाही.

नवी दिल्ली : ‘‘काँग्रेस पक्षाच्या मिटिंगसाठी आम्ही दिल्लीत आलो आहोत. ‘सामना’तील कोणत्याही बातमीवर अथवा लेखावर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. कारण, मी सामना वाचतच नाही. आम्हाला आणि आमच्या नेत्यांना शिवसेनेच्या प्रमाणपत्राची गरज नाही. कारण, या देशाला सूईपासून रॉकटपर्यंत उभं करण्याचं काम काँग्रेसने केलेले आहे. गांधी परिवार टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की सूर्यावर जो थुंकेल, ते त्यांच्याच अंगावर पडेल,’’ असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सामनातील आजच्या अग्रलेखावरून शिवसेनेला लगावला. (Congress leaders do not need Shiv Sena certificate : Nana Patole)

प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यासह अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर हेही पक्षाच्या बैठकीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी माध्यमाशी संवाद साधताना शिवसेनेकडून काँग्रेस पक्षनेतृत्वाकडे वारंवार बोट दाखवले जात आहे, या प्रश्नावर पटोले यांनी उत्तर दिले.

हेही वाचा : काँग्रेसमध्ये मोठी घडामोड...पटोलेंसह अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल

काँग्रेस ही निडर कार्यकर्ते घडविणारी फॅक्टरी आहे का. ते पहावे लागेल, अशी विचारणा शिवसेनेकडून वारंवार का केली जात आहे. यावर नाना पटोले म्हणाले की कोणी काय टीका करावी, हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही त्यांच्याबद्दल बोलायचे की बोलायचे नाही, हे ठरविण्याचा अधिकार आमचा असतो. एखाद्या पक्षाकडून तेही सोबत असलेल्या वारंवार त्याच गोष्टी बोलल्या जात असतील, त्याचा विचार आम्हीही एकदा करू.

विमानतळाचे मुख्यालय मुंबईहून अहमदाबादला हलविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्याबद्दल पटोले म्हणाले की आगामी काळात देशाची राजधानी अहमदाबदला गेली तर आश्चर्य वाटायला नको. देशाचे जे राज्यकर्ते आहेत, त्यांची नियत आणि नीतीबद्दल लोकांच्या मनात आता संशय निर्माण झाला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराबाबत सरकारकडून कोणतेही दिलासादायक पाऊल उचलेले जात नाही. दुसरीकडे, फोन टॅपिंगवरून संसदेत सोमवारी (ता. १९ जुलै) गोंधळ झाला. जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारण्यासाठी लोकांचे व्यक्तीस्वातंत्र हिरावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या माध्यमातून शेतकरी, बेरोजगारी आणि महागाई ह्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे हलविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहेत. महाराष्ट्रात माझाही फोन २०१६-१७ मध्ये टॅपिंग झाला होता. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडून गोपनीयतेचा भंग होता, तेव्हा त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार राहत नाही. त्यापलीकडे ते सांगतात की आम्ही यापेक्षा जादा फोन टॅपिंग करू. याचाच अर्थ त्यांना लोकशाही मान्य नाही, असा आरोपही नाना पटोले यांनी भाजपवर केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख