Congress leaders displeased after meeting Chief Minister Uddhav Thackeray | Sarkarnama

बाळासाहेब थोरात म्हणतात," " नाराजी नव्हतीच, मुख्यमंत्र्यांबरोबर काही मुद्यावर चर्चा करायची होती ! ''

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 जून 2020

निर्णय प्रक्रियेत कॉंग्रेसला विचारात घेतले जात नाही हा या पक्षाच्या नेत्यांचा मुख्य आक्षेप होता. याच मुद्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती

मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या नाराज कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमच्यात नाराजी नव्हतीच. काही विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची होती. तशी चर्चा झाली आहे. चर्चेतून मार्ग निघेल असे म्हटले आहे 

निर्णय प्रक्रियेत कॉंग्रेसला विचारात घेतले जात नाही हा या पक्षाच्या नेत्यांचा मुख्य आक्षेप होता. याच मुद्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट मागितली होती. मात्र काही कारणात्सव ही होऊ शकली नव्हती. काल मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि खासदार अनिल देसाई यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. 

कॉंग्रेस नेमके कशाबाबत नाराजी आहे याची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली होती. कालच्या भेटीनंतर आज कॉंग्रेस नेते दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन भेटले. या भेटीत कॉंग्रेसने आपले मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे समजते. मातोश्रीवरील बैठकीनंतर कॉंग्रेस नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थित होते. या बैठकीविषयी थोरात म्हणाले, की राज्यात कोरोनाचे संकट आहे. गरीब लोकांना मदत करायची आहे. सरकार आमचे असल्याने प्रशासकीय जबाबदारी आमच्यावर आहे. 

निसर्ग चक्रिवादळानंतर मी ही कोकणचा दौरा केला होता. तेथे वाड्यावस्त्या आहेत. कोकणी माणसाला तातडीने मदत मिळावी अशी आमची मागणी आहे. आम्हाला जे काही सांगायचे आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आहे आणि चर्चेतून मार्ग निघेल. 

दरम्यान, कॉंग्रेसच्या नाराजीवर विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली होती. कॉंग्रेस लाचार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर शिवसेनेच्या मुखपत्रातही कॉंग्रेसवर झालेल्या टीकेने या पक्षाचे नेते नाराज होते.

थोरात यांनी तर शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सविस्तर माहिती घेऊन पुन्हा अग्रलेख लिहा असा टोलाही त्यांनी लगावला होता.  

 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख