मोदी हे कितवे आश्चर्य? 'या'नेत्याने उपस्थित केला सवाल - Congress Criticism on BJP over Cancellation of Parliament Session | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी हे कितवे आश्चर्य? 'या'नेत्याने उपस्थित केला सवाल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

दोन दिवसांच्या अधिवेशनावर टीका करणारे हेच भाजपा नेते आता कोविडमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशनच रद्द करण्यात आले त्यावर मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा ठेवल्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात बोंब ठोकत महाविकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य असे म्हटले. अधिवेशनाच्या कालावधीवरून महाविकास आघाडी सरकारला हिणवणारा भाजपा हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे,'' अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. 

दोन दिवसांच्या अधिवेशनावर टीका करणारे हेच भाजपा नेते आता कोविडमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशनच रद्द करण्यात आले त्यावर मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.

 यासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले, "कोरोनाच्या संकटामुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेण्यात येत असल्याने विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने आकांडतांडव केले. सरकार चर्चेपासून पळ काढत आहे असा आरोप करत दोन दिवसांच्या अधिवेशनाची भाजपा नेत्यांनी खिल्ली उडवली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने दोन दिवसांचे का होईना अधिवेशन घेतले पण केंद्रातील भाजपाच्या सरकारने तर चक्क अधिवेशनच रद्द केले याला काय म्हणायचे. मोदी सरकार चर्चेपासून पळाले असेच म्हणायचे का? सर्व अनलॉक करताना कोरोनाचा धोका होत नाही आणि मंदिर उघडल्यासच कोरोनाचा धोका कसा काय वाढतो?, असे प्रश्न विचारत भाजपाने राज्यात आंदोलनाच्या माध्यमातूनही गोंधळ घातला होता. आता हे ढोंगी लोक त्यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदींना असे प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवतील काय?"  

"पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ साली पहिल्यांदा संसदेत प्रवेश करताना, संसदेला लोकशाहीचे पवित्र मंदिर म्हणत संसदेसमोर नतमस्तक झाले होते आणि नवीन संसद भवनच्या भूमिपूजनावेळी त्याची आठवण करत पुनरुच्चारही केला. तसेच लोकसभेचे विद्यमान सभापती ओम बिर्ला यांनीही, संसद हे पवित्र मंदीर आहे असा उल्लेख केला होता. लोकप्रतिनिधींनी संसद, विधिमंडळात जास्तीत जास्त वेळ घालवून सामान्य लोकांच्या प्रश्नांचा उहापोह करुन जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे असे त्यांनी म्हटले होते. जर नरेंद्र मोदी स्वतः संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हणत असतील तर ते अधिवेशन काळात का उघडले नाही आणि तोच भाजपा मंदिरे उघडण्यासाठी राज्यात घंटा बजाव आंदोलन करतो तसेच आंदोलन आता संसदेसमोर करणार का?,'' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

संसद हे लोकशाहीचे मंदीर उघडल्यानंतर भाजपा नेत्यांच्या जीवाला कोविडमुळे धोका उत्पन्न होईल अशी भाजपाची मानसिकता असेल तर मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करताना जनतेच्या जीवाची पर्वा त्यांना नव्हती का? भाजपा हा राजकारण करण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर उतरुन देवाचाही उपयोग करतो हेच यातून दिसते असे सावंत म्हणाले. भाजपाचे नेते यांच्या करनी आणि कथनीमध्ये अंतर असल्याचेच हे द्योतक आहे, असेही सावंत म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख