मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुर सुरु झाली आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांनी निधीवाटपावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
महाविकास आघाडीत अधूनमधून नाराजीचे वारे वहात असतात. मागेही काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे बदल्यांवरुन तसेच निधी वाटपावरुन नाराजी व्यक्त केली होती. काल वर्षा बंगल्यावर बैठक झाली. त्यात नाराजीचा सूर निघाला. अर्थमंत्री असलेले अजित पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना झुकते माप देत असल्याचे काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. सध्या अजित पवार जिल्हानिहाय वार्षिक आढावा घेत आहेत. त्यात काँग्रेसचे पालकमंत्री असलेले जिल्हे आहेत. त्या ठिकाणी वार्षिक आराखड्यात निधी कमी केल्याची काँग्रेसच्या मंत्र्यांची तक्रार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांना जास्त निधी मिळत असल्याचा काँग्रेसच्या मंत्र्यांचा आक्षेप आहे. त्यात राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचे वाटपही रखडले आहे. या अगोदर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तरीही मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही न केल्याने आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी काँग्रेसने आक्रमक भूमीका घेतली आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आगामी महापालिका निवडणुकांत कॉंग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत सर्वांनी एकदिलाने काम करून कॉंग्रेसला विजयी करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार व ठाणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिट्यांच्या बैठका घेऊन निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार कुणाल पाटील, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, माणिकराव जगताप, मोहन जोशी, माजी आमदार मधू चव्हाण, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी उपस्थित होते.
Edited By - Amit Golwalkar

