महाराष्ट्र 'अॅाक्सिजन'वर; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय... - Cntral government supply 6177 metric tonnes of oxygen states | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्र 'अॅाक्सिजन'वर; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय...

वृत्तसंस्था
रविवार, 18 एप्रिल 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ तासांत तीन वेळा फोन केला होता.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. आज हा आकडा 68 हजारांवर पोहचला आहे. तसेच अॅाक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी अॅाक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दुरध्वनीवरून संपर्क साधत होते. पण ते बंगाल दौऱ्यावर असल्याने चर्चा होऊ शकली नसल्याचा दावा केला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ तासांत तीन वेळा फोन केला, पण  पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारात असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पुन्हा संपर्क साधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. महाराष्ट्राला तातडीने 1200 ते 1500 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी ते मोदींकडे करणार होते.

या दाव्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने सतत केंद्र सरकारकडे बोट दाखविले जात असल्याची टीका कऱण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अॅाक्सिजन पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय मंत्री पियष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील विविध राज्यांना केंद्राने 6 हजार 177 मेट्रिक टन अॅाक्सीजन पुरवठा करण्याची योजना बनविण्यात आली आहे. ता. 20 एप्रिलनंतर महाराष्ट्राला सर्वाधिक 1500 टन अॅाक्सिजन पुरवला जाईल. दिल्लीला 350 टन तर उत्तर प्रदेशला 800 टन उपलब्ध करून दिला जाईल. साथ येण्यापूर्वी देशात दररोज हजार ते बाराशे टन वैद्यकीय अॅाक्सिजन लागत होता. सध्या ही मागणी 4 हजार 795 टनांवर गेली आहे. मागील वर्षभरात आपण उत्पादन क्षमता वाढवली आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

रेल्वेने अॅाक्सिजन पुरवठा होणार

अॅाक्सिजनची वाहतुक अधिक वेगाने आणि सुलभ होण्यासाठी रेल्वेने लिक्वीड अॅाक्सिजनची वाहतुक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रालाही यामाध्यमातून अॅाक्सीजन पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी ग्रीन कॅारीडॅार्स तयार केले जाणार आहे. लिक्वीड अॅाक्सिजनचे टँकर किंवा सिलेंडरची वाहतुक रेल्वेकडून केली जाईल, असे गोयल यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख