'त्या' भेटीबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती होती : संजय राऊत - CM Was Aware of Meeting Between Me And Devendra Fadanavis Claims Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

'त्या' भेटीबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती होती : संजय राऊत

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. शिवाय ते राज्यात विरोधी पक्षनेते आहेत. भाजपने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. आमच्या वैचारिक मतभेद असू शकता. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले आहे

मुंबई : माझी व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल झालेली भेट ही काही कामानिमित्त होती. आमच्या भेटीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. काल झालेल्या या भेटीवरुन राजकीय चर्चेचे वादळ उठले आहे. राज्यातल्या महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दलही या भेटीनंतर शंका व्यक्त केली गेली. 

याबाबत बोलताना राऊत म्हणाले, ''काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. शिवाय ते राज्यात विरोधी पक्षनेते आहेत. भाजपने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. आमच्या वैचारिक मतभेद असू शकता. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही,"

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची शनिवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या उभयतांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता आहे की काय, अशी शंका बोलून दाखवली जात आहे. मात्र शिवसेनेतील नेत्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील महाआघाडी सरकार स्थिर असून अजिबात धोका नसल्याचा दावा केला होता. 

प्रत्यक्षात ही भेट बिहार निवडणुकीच्या निमित्ताने मुलाखत घेण्यासाठी ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत यांनी 'सामना'साठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी फडणवीस यांची इच्छा आहे. अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले आहे. 

दरम्यान, अकाली दलाने केंद्रात एनडीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याबद्दली राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. "शिवसेना व अकाली दल हे एनडीएचे मजबूत स्तंभ होते. आम्हाला एनडीएमधून बाहेर पडणे भाग पडले. आता अकाली दलही बाहेर पडले आहे. एनडीएला नवे सहकारी मिळाले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. ज्या आघाडीत शिवसेना व अकाली दल नाहीत ती एनडीए आहे असे मी मानतच नाही," असे राऊत म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख