केंद्राचा 'तो' भूखंड आम्हाला नकोच; मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर - CM Uddhav Thackeray Denies Central Government Land | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्राचा 'तो' भूखंड आम्हाला नकोच; मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 डिसेंबर 2020

हापालिकेने बिमस्ट्रोवॅड प्रकल्पअंतर्गत माहूल खाडीवर उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा भुखंड मिठागार आयुक्तालयाचा असल्याने तो ताब्यात मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पालिका प्रयत्न करत आहे; मात्र याबाबत मिठागार आयुक्तांनी अद्याप पालिकेला दाद दिलेली नाही.

मुंबई  : कांजूरमार्ग येथील मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या भुखंडावरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारा माहुल येथील मिठागार आयुक्तालयाचा भुखंड मुंबई पालिकेच्या पंपिंग स्टेशनसाठी हस्तांतरीत करत नसल्याचे जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागरीकांशी संवाद साधताना ही माहिती जाहीर केली. महापालिकेने बिमस्ट्रोवॅड प्रकल्पअंतर्गत माहूल खाडीवर उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा भुखंड मिठागार आयुक्तालयाचा असल्याने तो ताब्यात मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पालिका प्रयत्न करत आहे; मात्र याबाबत मिठागार आयुक्तांनी अद्याप पालिकेला दाद दिलेली नाही. 

पालिकेने जुलै महिन्यात हा भुखंड आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता; मात्र तरीही प्रतिसाद न मिळाल्याने ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्येदेखील हा मुद्दा मांडला होता. तरीही अद्याप हा भुखंड पालिकेला मिळालेला नाही. त्यातच कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेवरून केंद्र व राज्यात वाद सुरू झाल्याने आता केंद्राची माहुल येथील जागाच पंपिंग स्टेशनसाठी हस्तांतरित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिकेने आतापर्यंत हाजीअली, वरळी येथे क्‍लिव्हलॅन्ड लव्हग्रो, रे रोड , खार येथील गझदरबंद, जुहू येथील ईर्ला येथे सहा पंपिंग स्टेशन उभारले आहेत. आता ओशीवरा येथील मोगारनाला आणि माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारायचे आहेत. मोगारानाला येथे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी लवकरच निवीदा मागवल्या जाण्याची शक्‍यता आहे.

नक्की वाद काय
महापालिका ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पाअंतर्गत माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारण्याचा प्रयत्न २००७ पासून करत आहे; मात्र हा परीसर दलदल आणि खारफुटीचा असल्याने जागा निश्‍चित होत नव्हती. काही वर्षांपुर्वी पालिकेने जागा निश्‍चित केली; मात्र ही जागा मिठागर आयुक्तांच्या मालकीची आहे. त्यांनी जागा हस्तांतरीत करावी म्हणून महापालिका गेल्या काही वर्षांपासून सतत पत्रव्यवहार करत आहे. मात्र मिठागर आयुक्तांकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

पंपिंग स्टेशनचे महत्त्व
महापालिका या ठिकाणी २८६ कोटी रुपये खर्च करुन उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारणार आहे. त्यातून सेकंदला १५० घनमिटर पाण्याचा निचरा करता येईल. समुद्राला भरती असतानाही शहरातील पावसाळी पाण्याचा निचारा करता येणार आहे. त्यामुळे चेंबूर, वडाळासह किंग्जसर्कल गांधी मार्केट या परीसरातील पुर परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होणार आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख