दिवाळीनंतर लाॅकडाऊनची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन - CM Uddhav Thackeray Address to State on the wake of Diwali | Politics Marathi News - Sarkarnama

दिवाळीनंतर लाॅकडाऊनची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

अन्य देशांत कोरोनाची पुन्हा लाट आली आहे. ही लाट नसून त्सुनामी आहे. त्यामुळे संयम राखून दिवाळी साजरी करा. लाॅकडाऊन लावण्याची वेळ आली तर त्याचे अर्थचक्रावरचे भयानक असतील. त्यामुळे ही दिवाळी साधेपणाने व फटाके न वाजवता साजरी करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

मुंबई : दिवाळी जवळ आलीये. समृद्धी आपल्या सर्वांच्या आयुष्यात येवो. हे सगळे होळीपासून सुरु झाले. दिवाळीच्या शुभेच्छा देतोय. आज देशाच्या राजधानीत, अन्य देशांत कोरोनाची पुन्हा लाट आली आहे. ही लाट नसून त्सुनामी आहे. त्यामुळे संयम राखून दिवाळी साजरी करा. लाॅकडाऊन लावण्याची वेळ आली तर त्याचे अर्थचक्रावरचे भयानक असतील. त्यामुळे ही दिवाळी साधेपणाने व फटाके न वाजवता साजरी करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, "आपण होळीपासून पुढचे सण अत्यंत संयमाने साजरे केले. गणेशोत्सव, दहीहंडी, ईद, अन्य समाजाचे सण-उत्सव घरात साजरे केले. तुम्ही सहकार्य केले म्हणूनच आपण दोघेही थोडे तणावमुक्त आहोत. दुसरी लाट येऊ नये ही चिंता आणि प्रार्थना आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. आता दिवाळी आली. जवळपास सगळे काही उघडले आहे. गर्दी वाढते आहे. जिवंतपणाचे लक्षण आहे. खबरदारी घ्यावी ही विनंती करायला संवाद साधत आहे,''

''गेले काही दिवस मुंबई-पुण्यासह सर्व ठिकाणी कोरोना वाढत होता. पण आपण सर्वांनी एका शिस्तीने हा चढ खाली आणला आहे. पण देशात व विशेषतः दिल्लीत आकडा वाढतो आहे. अन्य देशांत आकडा वाढतो आहे. दिल्लीत प्रदुषण वाढले आहे. हा विषाणू श्वसनसंस्थेला घातक आहे. दिवाळी साजरी करताना मी विनंती करेन की फटाके वाजवू नका. फटाक्यावर बंदी आणायची का? तर आणू शकतो. पण आपण स्वतःहून दिवाळी साधेपणाने साजरी करु शकत नाही का? दिवाळीत फटाके टाळू शकतो का? बंदी आणू शकतो. पण एकमेकांवर विश्वास आहे. त्यामुळे बंदी आणलेली नाही," असेही ते म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले, "लहानपणी मी सुद्धा फटाके वाजवले आहे. लहान मुलांना आनंद असतो. अभ्यंगस्नान करुन पहिला फटाका कोण लावतो ही गंमत होती. आतापर्यंत आपण जे कमावले ते चार दिवसांच्या धुरात वाहून जाता कामा नये. सार्वजनिक जागी फटाके वाजवायचे नाहीतच. रोषणाई जरुर करा. दिपावली म्हणजे दिवा. भरपूर रोषणाई करा. पण फटाके न वाजवाल तर उत्तम. मर्यादेत फटाके वाजवत असलात तर ठीक आहे. मी तुमच्यावर आणिबाणी नाही आता परिस्थिती आटोक्यात आली असे वाटत असले तरी दिवाळीनंतरचे पंधरा दिवस महत्त्वाचे आहेत,''

लंडनमध्ये कडक लाॅकडाऊन केला आहे. इतर ठिकाणीही निर्बंध आहेत. कारण बेफिकीरी. ही लाट नाही ही त्सुनामी आहे. आपणाकडे होऊ द्यायचे नाही. सहाआठ महिने आपली यंत्रणा तणावाखाली लढताहेत. पोलिस मृत्युमुखी पडलेत. काही डाॅक्टर्स गेले. सर्वांवर असह्य ताण आहे. 

''जो सैनिक आपल्यासाठी लढतो. त्याच्या अंगावर शस्त्रांचे व साहित्याचे वजन असते. आपल्याकडे कोरोनाशी लढायला मास्कचे शस्त्र आहे. तो लाऊन आपण लढाई लढू शकत नाही? १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लू आला होता. दोन ते तीन वर्षे जगाला परेशान केले होते. त्यावेळी देशात एक कोटीच्या आसपास लोक मृत्युमुखी पडले होते. मी घाबरवत नाही, सतर्क राहण्यासाठी या सूचना देतो आहे. अर्थचक्राला गती देताना वेडावाकडा प्रयत्न झाला तर अधोगती होईल,'' असाही इशारा त्यांनी दिला. 

''पुन्हा लाॅकडाऊन केला तर मग परिणाम भयंकर असतील. आरोग्य सुविधा राहतीलच. पण या आरोग्य सुविधा वापरायची वेळ येऊच नये. सुविधा वाढवायला मर्यादा आहेत. आता रुग्णशय्या चार लाखांवर नेल्या आहेत. त्याला इतर सुविधा लागतात. दुपटी तिपटीची लाट आली तर त्रेधातिरपीट उडू शकते,'' अशीही जाणीव उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख