फडणवीसांवर योग्य उपचारांच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना - CM ordered All Possible Treatement to Devendra Fadanavis Informs Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांवर योग्य उपचारांच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचाराच्या सर्व सुविधा मिळाव्यात याची सरकार काळजी घेत आहे. तशा सूचना मुख्यमंत्र्यांनीही दिल्या आहेत,'' अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचाराच्या सर्व सुविधा मिळाव्यात याची सरकार काळजी घेत आहे. तशा सूचना मुख्यमंत्र्यांनीही दिल्या आहेत,'' अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. आम्ही फडणवीसांना सांगत होतो की काळजी घ्या. राज्यातली परिस्थिती किती गंभीर आहे हे फडणवीसांना कळले असेल, असेही राऊत म्हणाले.

आज शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या सावरकर स्मारकातून होत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिला मेळावा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने आजच्या मेळाव्याला खास महत्त्व आहे. त्याबाबत माहिती देताना राऊत म्हणाले, " आजचा मेळावा घरी बसून पाहता येईल. महाराष्ट्रात दोन कोटी लोक आजचा मेळावा पाहतील. शंभराच्या आत आकडा असावा याची काळजी आम्ही घेतली आहे. काही आमदारांना बोलावले आहे. आमदार आहेत, मंत्री असतील. कोरोनाचे संकट नसते तर शिवतीर्थाचे मैदान कमी पडले असते,'' 

''ठाकरेंनी सीमोल्लंघनाची तयारी पूर्ण केली आहे. आजच्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या दसरा मेळाव्यात बोललो होतो की मुख्यमंत्री महाराष्ट्राचाच होणार.  दसरा मेळाव्यात मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून वक्तव्य करेन, असे ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे मास्क काढून बोलण्याची आजची वेळ असू शकते. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा आहे,'' 

संघाने सभागृहात घेतलेल्या दसरा मेळाव्याचे राऊत यांनी यावेळी कौतुक केले. कोरोना लशीबाबत बोलताना ते म्हणाले, ''प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचली पाहिजे. आम्ही देश म्हणून पाहतो. फक्त निवडणुका आहे म्हणून लशीचे राजकारण करावे, इतक्या कोत्या मनोवृत्तीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. कोरोनाची लस प्रत्येकाला मोफत मिळावी ही आमची इच्छा आहे,''
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख