काहीजण म्हणतात कर्फ्यू लावा; पण मी म्हणतोय स्वयंशिस्त पाळा : उद्धव ठाकरे  - Chief Minister Uddhav Thackeray's appeal to keep Corona away by following the Trisutri | Politics Marathi News - Sarkarnama

काहीजण म्हणतात कर्फ्यू लावा; पण मी म्हणतोय स्वयंशिस्त पाळा : उद्धव ठाकरे 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

त्रिसूत्री पाळून कोरोनाला चार हात दूर ठेवा.

पुणे : आत्तापर्यंत दिलेल्या सहकार्यामुळे आपण कोरोनाला थोपवून धरले आहे. मात्र, गर्दी केल्यास संसर्ग वाढू शकतो. दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. तिची पहिल्या लाटेशी तुलना करता ही नुसती लाट नव्हे; सुनामी आहे की काय? अशी भीती वाटते, त्यामुळे जनतेने गर्दी टाळावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. 22 नोव्हेंबर) केले. 

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी काहीजण मला सूचवतात रात्रीचा कर्फ्यू लावा. पण सगळ्या गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही. अनावश्‍यक ठिकाणी जाऊ नका, गरज नसेल तर घराबाहेर जाण्याचे टाळा, म्हणजेच स्वयंशिस्त पाळा, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

दिवाळीत फटाके वाजू नका, असे आवाहन मी जनतेला केले होते. ते जनतेने पाळले. तशी दक्षता तुम्ही घेतली. तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे दिवाळीच्या पाडव्याला मंदिरे उघडली. मात्र, काही मंदिरात गर्दी होत असल्याच्या बातम्या दिसत आहेत. काही मंदिरातील व्यवस्था कोलमडल्याचे कानावर येत आहे. शिर्डीच्या साई मंदिरात तशी घटना घडल्याची ऑनलाइन बातमी वाचली, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

गर्दी न करता कार्तिकी वारी साजरी करूया 

गणेशोत्सव, छटपूजा यासारखे सणही गर्दी न करता साजरे करण्यात आले. त्यापूर्वी आषाढी वारीचा पालखी सोहळाही आपण गर्दीविना पार पडला. त्यामुळे आगामी कार्तिकीच्या वारीच्या पार्श्‍वभूमीवरही सर्वांनी काळजी घ्यावी. गर्दी न करता कार्तिकी वारी भक्तीभावने साजरी करूया, असे आवाहनही त्यांनी केले. 

महाराष्ट्राच्या आरोग्याचा नकाशा तयार करायचाय
कोरोना वॉरिअर्संनी घरोघरी जाऊन जी मोहीम राबवली, त्यामुळे कोरोनावर आपण काहीअंशी नियंत्रण मिळविले आहे. त्यातून महाराष्ट्राच्या आरोग्याचा नकाशा तयार करायचा आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले. 

शाळा उघडणं अजूनही प्रश्‍नांकीत 
तुम्ही केलेल्या सहकार्यामुळेच कोरोना रुग्णांचा आकडा खाली आला. पण, मी तुमच्यावर थोडासा नाराज आहे, असे सांगून आज अनेक जण मास्क न घालता फिरतात, गर्दी करतात. हे कशासाठी? सर्व काही उघडले म्हणजे कोरोना संपले असे नाही. आपण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण शाळा उघडणं अजूनही प्रश्‍नांकीत आहे, त्यामुळे कोरोनाला गांभीर्याने घ्या, अशी सूचना त्यांनी केली. 

रुग्णालये कमी पडली तर कोणीही वाचवू शकणार नाही 
परदेशात कोरोनाची लाट गांभीर्याने घेतली आहे. दुसरी लाटेची पहिल्या लाटेशी तुलना करता ती सुनामीसारखी येण्याची भीती वाटत आहे. अहमाबादमध्ये रात्रीची संचार बंदी करण्यात आली आहे. निमलष्करी दलातील डॉक्‍टर दिल्लीत तैनात करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालये कमी पडली तर आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही, अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. 

लस हातात येईपर्यंत काही खरे नाही 
आरोग्य यंत्रणा, पोलिस गेल्या आठ महिन्यांपासून राबत आहे. त्यांच्यावरील ताण तणाव कमी करणे, तो वाढू न देणे हे आपले कर्तव्य आहे. लस हातात येईपर्यंत काही खरे नाही. पहिला डोस आणि बूस्टर डोस असे दोन डोस द्यावे लागणार आहेत. त्यानुसार राज्यातील बारा कोटी जनतेला आपल्या चोवीस कोटी डोस द्यावे लागतील, त्यामुळे मास्क लावा, आंतर पाळा, हात धुवा ही त्रिसूत्री पाळून कोरोना चार हात दूर ठेवा, असे विनंतीही त्यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख