Chief Minister stays away, Shiv Sena leader Anil Desai meets Balasaheb Thorat! | Sarkarnama

मुख्यमंत्री राहिले दूर, शिवसेना नेते अनिल देसाई बाळासाहेब थोरातांना भेटले ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 जून 2020

खासदार अनिल देसाई हे कॉंग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटले आहे

मुंबई : आघाडी सरकारमधील कॉंग्रेसचे मंत्री गेल्या काही दिवसापासून नाराज आहेत. निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही असा नाराजीचा सूर कॉंग्रेसने लावला आहे

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून खासदार अनिल देसाई हे कॉंग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटले आहे. 

या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही. कॉंग्रेसची नेमकी नाराजी का ? काय भूमिका आहे याची चाचपणी शिवसेनेकडून सुरू आहे. थोरात आणि देसाई यांच्यात अर्धा तास चर्चा झाली आहे. बाळासाहेबांचे नेमके काय म्हणणे आहे हे देसाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार आहेत. 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह कॉंग्रेसचे काही मंत्री मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार होते. पण, काही अडचणीमुळे ही भेट होऊ शकली नाही. निसर्ग वादळ, मुख्यमंत्र्यांच्या सासऱ्यांचे निधन यामुळे ही होऊ शकली नव्हती. 

आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासदार अनिल देसाई यांना बाळासाहेब थोरातांच्या भेटीला पाठविले आहे. या बैठकीनंतर कॉंग्रेसचे मंत्री मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार का याचीही उत्सुकता आहे. 

दरम्यान, आमचं महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे. कोणीही आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करू नका असा कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना दिला आहे. 

आघाडीत मतभेद आहेत! सरकार अडचणीत आहे का ? असे प्रश्‍न मंत्री वडेट्टीवार यांना केला असता त्यांनी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि सरकार चांगले काम करीत असल्याचा निर्वाळा दिला. 

काही निर्णय होत असताना कॉंग्रेसला विचारात घेतल जात नव्हतं. विचारात घेतलं जाव एवढीच आमची मागणी होती असे सांगून वडेट्टीवार म्हणाले, की तीन पक्षांचे सरकार आहे त्यामुळे सत्तेत समान वाटा मिळावा. ती मांडण्याची संधी आम्हाला द्यावी आणि समान न्याय व्हावा ही पक्षातील आमदार आणि नेत्यांची इच्छा आहे.

कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर कॉंग्रेसला विचारावा कारण तीन पक्षांच सरकार आहे. आमचं सरकार चांगलं काम करत आहे कोणी कितीही आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न केला तरीही काही होणार नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन पुढे जाण्याचा नाही तर थांबण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे कोणीही आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करू नये.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख