खासगी रुग्णालयांतील खाटांची क्षमताही संपण्याच्या मार्गावर

पावसाळा तोंडावर आल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता असल्याने प्रशासनाला आणखी काही खाटा वाढवण्याची गरज आहे.त्यादृष्टीने पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे.
खासगी रुग्णालयांतील खाटांची क्षमताही संपण्याच्या मार्गावर

मुंबई : मुंबईत वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेत पालिकेने खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड ताब्यात घेतले; मात्र कोरोना खाटांसह आयसीयू खाटांची क्षमता संपत आली आहे.

खासगी रुग्णालयांतील सर्वसाधारण कोरोना खाटा 96 टक्के भरल्या असून आयसीयूतील केवळ एक टक्का खाटा शिल्लक आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने सरकारच्या कोव्हिड तसेच सर्वसाधारण रुग्णालयांतील खाटांची क्षमता संपल्याने खासगी रुग्णालयांतील 80 टक्के खाटा घेण्याचा निर्णय केला. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ मुंबईत असणाऱ्या खासगी रुग्णालयांत तसेच नर्सिंग होममधील 4,400 खाटा उपलब्ध झाल्या. 

वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोव्हिड रुग्णांसाठी रुग्णालयातील खाटा कमी पडत असल्याने काही रुग्णांसाठी हा पर्याय खुला झाला. या निर्णयामुळे सर्वसाधारण खाटा, आयसीयू, व्हेंटिलेटरची सुविधा असणाऱ्या खाटा उपलब्ध झाल्याने खासगी रुग्णालयांतही रुग्णांनी धाव घेतली.

सरकारने खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होममधील उपलब्ध खाटांवर उपचार घेणाऱ्या कोव्हिड रुग्ण तसेच इतर आजारांतील रुग्णांसाठी दरदेखील निश्‍चित केले आहेत. शिवाय या रुग्णालयांतील उपलब्ध खाटांची माहिती रुग्णांना एका "हेल्प लाईन'च्या माध्यमातून जाणून घेता येते.

पालिकेने घेतलेल्या रुग्णालयांतील आयसोलेशन वॉर्डमधील कोव्हिड रुग्णांसाठीचा एका दिवसाचा दर हा चार हजार रुपये, आयसीयूसाठी जास्तीत जास्त 7,500 इतका दर निश्‍चित करण्यात आला असून व्हेंटिलेटरसाठी दिवसाला नऊ हजार रुपये इतका दर निश्‍चित करण्यात आला आहे.

सरकारने निश्‍चित केलेल्या दरांमध्ये औषध-गोळ्या, डॉक्‍टर, नर्स यांची फी तसेच जेवण आणि खाटेचे भाडे यांचा समावेश आहे; मात्र कोव्हिड चाचणी, पीपीई किट, एमआरआय, सीटी स्कॅन आणि काही महागड्या औषधांचे वेगळे पैसे आकारले जात आहेत. यापूर्वी खासगी रुग्णालयांत यापूर्वी व्हेंटिलेटर वापरणाऱ्या कोव्हिड 19 रुग्णांसाठी 40 ते 50 हजार रुपये आकारले जात होते.

 नव्या दरांमुळे रुग्णांचा साधारणतः 82 टक्के खर्च कमी झाला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 62 हजारांच्या वर गेली असून देशातील प्रत्येकी तीन रुग्णांमधील एक रुग्ण हा राज्यातील आहे.

राज्य सरकरच्या या नव्या परिपत्रकामुळे "चॅरिटेबल ट्रस्ट'च्या माध्यमातून चालणारी एच. एन. रिलायन्स, लीलावती, ब्रिचकॅण्डी, जसलोक, बॉम्बे हॉस्पिटल, भाटिया, ओक्‍हार्ड, नानावटी, फिरतीस, एल. एच. हिरानंदानी, पी. डी. हिंदुजा या मोठ्या रुग्णालयांसह इतर छोटी आणि नर्सिंग होममधील खाटा स्वस्त दरात उपलब्ध झाल्या आहेत.

याशिवाय इतर खर्चावरदेखील सरकारने नियंत्रण आणले आहे. पीपीई किट, पेसमेकर, इन्ट्रोक्‍युलर लेन्सेस, स्टेंट्‌स, कॅथेतर, बलून, मेडिकल इम्प्लांटस यांचे दर प्रत्यक्ष किमतीच्या 10 टक्‍क्‍यांच्या वर आकारण्यास मनाई करण्यात आली आहे. याचाच अर्थ पीपीई किटची किंमत जर का 100 रुपये असेल, तर त्यासाठी 110 रुपयांच्या वर किंमत आकारता येत नाही. 

यासह जी रुग्णालये आहेत तिथे ऍन्जिओप्लास्टीसाठी 12 हजार, नैसर्गिक प्रसूतीसाठी 75 हजार, डायलिसिस 2,500, व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटसाठी तीन लाख 23 हजार, पर्मनंट पेसमेकरसाठी एक लाख 38 हजार आणि कॉंट्रॅक्‍ट सर्जरीसाठी 25 हजारांहून अधिक दर आता आकारता येणार नाहीत. त्यामुळे रुग्णांसाठी वाजवी दरात खासगी रुग्णालयांची सेवा उपलब्ध झाली असून रुग्णांची होणारी लूट थांबली आहे.

पालिकेचे नियोजन सुरू
खासगी रुग्णालयांतील 80 टक्के खाटा ताब्यात घेऊन तेथे पालिकेने रुग्णांना कमी दरात उपचार उपलब्ध करून दिला; मात्र त्यातील ही 96 टक्के खाटा भरल्याने पालिकेला आता आणखी खाटांची तजवीज करावी लागणार आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांतील कोरोना खाटांची संख्या 10 हजारपर्यंत वाढवण्याबरोबरच आयसीयू बेड्‌स 240 ने वाढवण्याचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com