राममंदिर भूमिपूजन : भाजपतर्फे मुंबईत धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन - BJP organizes programs in Mumbai on the foundation stone of Ram Mandir | Politics Marathi News - Sarkarnama

राममंदिर भूमिपूजन : भाजपतर्फे मुंबईत धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

भाजपाच्या मुंबईतील सर्व कार्यालयांवर दिव्यांची आरास करण्यात येणार आहे.

मुंबई : अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन बुधवारी होत असताना त्यात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींमार्फत वेगवेगळ्या प्रकारे धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एलईडी स्क्रीनवर अयोध्येतील समारंभाचे थेट प्रक्षेपणही केले जाईल.

यानिमित्ताने भाजपाच्या मुंबईतील सर्व कार्यालयांवर दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. तर अनेक चौकात श्रीरामाच्या प्रतिमांचे पूजन करून लाडू, पेढे व मिठाई वाटण्यात येईल. भाजपच्या दादर येथील शहर मुख्यालयात मंगळवारी संध्याकाळी गीतरामायणाचा कार्यक्रम होईल.

यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारसेवकांचा सत्कारही करतील. तर शहर अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातील बाणगंगा या प्राचीन मंदिरात दीपोत्सव आयोजित केला आहे. बुधवारी गिरगावातील प्रत्येक मंदिरात दीपोत्सव होईल तर सर्वत्र भगवे ध्वज लावले जातील.

बोरीवलीत घंटानाद
उत्तर मुंबईत बोरीवलीचे आमदार सुनील राणे, कांदीवली (पूर्व) चे आमदार अतुल भातखळकर, चारकोपचे आमदार योगेश सागर हे स्वतः घंटानाद, पूजा आदी कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. तेथील सर्व नगरसेवक कार्यालये दिव्यांनी सजविण्यात येणार आहेत. त्याखेरीज दिव्यांची आरास, आरत्या, मंदिरांवर पुष्पवर्षाव होईल.

बोरिवलीत अनेक चौक फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजविण्यात येतील व सहा ठिकाणी घंटानाद करण्यात येईल. तर वायव्य आणि ईशान्य मुंबईत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन ते तीन ठिकाणी सुंदरकांड वाचन, भजन कीर्तन असे कार्यक्रम होतील. घाटकोपर पूर्व येथील आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होतील.

पार्ल्यात थेट प्रक्षेपण
आमदार पराग आळवणी यांच्या विलेपार्ले मतदारसंघातील प्रत्येक चौकात भव्य श्रीरामपूजन होईल व पाऊस नसेल तर अनेक ठिकाणी एलईडी स्क्रीनवरून अयोध्येतील श्रीराममंदिराच्या भूमिपूजनाचे थेट प्रक्षेपण होईल. आमदार प्रसाद लाड यांच्यातर्फे शिव सर्कल येथे मोठ्या एलईडी स्क्रीनवरून अयोध्येतील भूमिपूजनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

त्याचबरोबर 1990 आणि 1992 मधील कारसेवकांचे प्रातिनिधिक सत्कारही करण्यात येतील. आमदार श्रीमती मनीषा चौधरी यांच्या दहीसर क्षेत्रात प्रत्येक वॉर्डात लाडू वाटप होईल. भाजप कार्यालयांचा संपूर्ण रस्ता रोषणाईने सजवण्यात येणार आहे. मंगळवारी सायंकाळी आमदार मनीषा चौधरी यांच्यातर्फे दहा हजार पणत्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख