राऊतांनी सुशांतच्या कुटुंबियांच्या बदनामीची सुपारी घेतली : राम कदमांची टीका - BJP Leader Slams Sanjay Raut over Saamna Editorial | Politics Marathi News - Sarkarnama

राऊतांनी सुशांतच्या कुटुंबियांच्या बदनामीची सुपारी घेतली : राम कदमांची टीका

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

बिहारच्या पोलिसांना तपासात हस्तक्षेप करू दिला असता तर कदाचित सुशांत व त्याच्या कुटुंबाचे रोजच धिंडवडे निघाले असते. बिहार राज्याने व सुशांतच्या कुटुंबाने त्यासाठी मुंबई पोलिसांचे आभारच मानायला हवेत, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये लिहिलेल्या अग्रलेखात म्हटले आहे. त्यावर राम कदम यांनी टीका केली आहे

मुंबई : देवाघरी गेलेल्या सुशांतसिंह राजपूत बद्दल मेल्यानंतर सुद्धा शिवसेना नेते बरे वाइट बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. अत्यंत वाईट शब्दात अपमानित करतात. मृत्युनंतर शत्रूला देखील बरं वाईट बोलू नये हा हिंदू धर्मातला संस्कार  शिवसेना नेते 'सामना'कार राजकारणाच्या स्वार्थापोटी विसरले, अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. 

एखाद्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे केव्हाही वाईटच. सुशांत वैफल्य, नैराश्याने ग्रासलेला होता. आयुष्याची उताराला लागलेली गाडी त्याला सावरता येत नव्हती. त्या धडपडीत तो भयंकर अशा अमली पदार्थांच्या नशेच्या आहारी गेला व एक दिवस गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. सुशांत हा एक चारित्र्यहीन, उडाणटप्पू तरुण कलाकार असल्याचे चित्र सीबीआय तपासानंतर बाहेर पडले. बिहारच्या पोलिसांना तपासात हस्तक्षेप करू दिला असता तर कदाचित सुशांत व त्याच्या कुटुंबाचे रोजच धिंडवडे निघाले असते. बिहार राज्याने व सुशांतच्या कुटुंबाने त्यासाठी मुंबई पोलिसांचे आभारच मानायला हवेत, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये लिहिलेल्या अग्रलेखात म्हटले आहे. त्यावर राम कदम यांनी टीका केली आहे. 

''सामनाकार स्वार्थापोटी विसरले हे दुर्दैव !  CBI तपास अजून पूर्ण झाला नाही त्याच्या आधीच आत्मसाक्षत्कार आशीर्वाद प्राप्त झालेले महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनानेते सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या बाबतीत चोकशी पूर्ण होण्या आधीच निष्कर्षापर्यंत येतात याचं आश्चर्य कमी पण त्याना कुणाला वाचवायचं आहें?  हा प्रश्न अधिक पडतो,'' असे ट्वीट कदम यांनी केले आहे.

'सामना'कार शिवसेना नेत्यांनी सुशांत आणि सुशांतच्या कुटुंबाला बदनाम करण्याची आणि अपमानित करण्याची सुपारी घेतल्याचे दिसते आहे. सुशांतच्या ७४ वर्षांच्या म्हाताऱ्या वडिलांना आणि कुटुंबियांना शिवसेनेने वारंवार अपमानित केले आहे, असेही राम कदम यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख