रियाच्या मागे कोण? पार्टी गँग? आशिष शेलार यांचा पुन्हा निशाणा - BJP Leader Ashish Shelar Targets Shivsena Again over Rhea Chakraborty | Politics Marathi News - Sarkarnama

रियाच्या मागे कोण? पार्टी गँग? आशिष शेलार यांचा पुन्हा निशाणा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आता राजकारणाने जोर धरला आहे. प्रत्येक मुद्द्यावर एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी भाजप व शिवसेना सोडत नाही, असे दिसते आहे. कंगना राणावतच्या कार्यालयावर केलेल्या अतिक्रमण कारवाईनंतर तर आरोप प्रत्योरोपांना अधिक जोर आला आहे

मुंबई : ''रियाने अटकेच्या वेळेस वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि दोन तासात सुशांत सिंह राजपूतच्या बहिणी विरूद्ध एफआयआर दाखल झाला. परंतु सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ६५ दिवसांत एफआयआर दाखल का झाला नाही? रियाला हे कोण सांगतेय? ड्रग्ज, पब आणि पार्टी गँग?'' असा सवाल उपस्थित करत भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी शिवसेना व विशेषतः आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

मुंबई महापालिकेने काल अभिनेत्री कंगना राणावतचे कार्यालय अतिक्रमण कारवाईच्या नांवाखाली तोडले. त्यावरून आता राजकारण सुरु झाले आहे. कंगनाने सुरुवातीपासून अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात विविध प्रश्न उपस्थित केले होते. तिने अनेक बाॅलीवूड अभिनेत्यांवर ड्रग सेवनाचे आरोप केले होते. त्यानंतर मुंबईबाबत केलेल्या विधानानंतर शिवसेनेने तिला लक्ष्य बनवले. तिनेही आक्रमक होत, शिवसेना नेत्यांना उत्तरे दिली. आता या सगळ्याच बाबींवर जोरदार राजकारण सुरु झाले आहे. 

काल आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली होती. कंगणा राणावत यांचे बांधकाम अनधिकृत होते तर एक महिन्यांपुर्वी, एक वर्षांपुर्वी का कारवाई महापालिकेने केली नाही. त्यामुळे ही सुड बुध्दीने केलेली कारवाई आहे, असे शेलार यांनी म्हटले होते. आमच्या सोबत आलात तर वाचवू नाही आलात तर घरात घुसून ठोकून काढू, असा ठोकशाही कारभार राज्यातील ठाकरे सरकार करतेय! आम्ही त्याचा निषेध करतो, असेही शेलार म्हणाले होते. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर रियाकडे एनसीबीने चौकशी केली. चार दिवसांच्या चौकशीनंतर रियाला अटक करण्यात आली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख