मुंबई : स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा 'उखाड दिया" ची भाषा..आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत”!सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी? असा सवाल करत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बाबत वाद सुरु असताना तिच्या बंगल्याचे बांधकाम महापालिकेने पाडले. त्यावेळी शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रात 'उखाड दिया' अशा शिर्षकाने या कारवाईची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याचा संदर्भ शेलार यांनी घेतला आहे. आता औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेच तूतू-मैंमैं सुरु आहे. त्यात आज प्रसिद्ध झालेल्या 'रोखठोक' या सदरात राऊत यांनी काँग्रेसला त्यांच्या धर्मनिरपेक्षतेबाबत सवाल विचारला आहे.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांसमोर टीका करीत आहेत. काँग्रेसच्या भूमिकेवर शिवसेनेने सामनामधून टीकेचे बाण सोडले आहेत. रोखठोक या सदरातून खासदार संजय राऊत यांनी बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? असा सवाल उपस्थित करून विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे.
मराठवाडय़ातील सरकारी कागदोपत्री 'औरंगाबाद' नामे असलेल्या शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे 'सेक्युलर' पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे राऊत यांनी म्हटले आहे. औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! असेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर शेलार यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.