परब, तुरूंगाची हवा खायला तयार व्हा...तुमचा वसुलीकांड बाहेर पडणार! - BJP attacks on anil parab over cbi enquiry of anil deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

परब, तुरूंगाची हवा खायला तयार व्हा...तुमचा वसुलीकांड बाहेर पडणार!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

कथित वसुलीप्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : कथित वसुलीप्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएच्या ताब्यात असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांने काही दिवसांपूर्वी एका पत्रामध्ये देशमुख यांच्यासह शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांचेही नाव घेतले होते. त्यावरून भाजपकडून परब यांचीही चौकशी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. 

भाजपने आज एकामागोमाग एक ट्विट करत परब यांच्या अटकेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ''वसुलीखोर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयचा छापा पडल्यानंतर आता याच वसुलीकांडातील सूत्रधार अॅड. अनिल परब यांचेही सगळे कर्मकांड बाहेर पडणार आहेत. याच कटात सामील असलेले काही भ्रष्टाचारी लोकं आता परबांना वाचवायला येऊ शकणार नाहीत,'' असे भाजपने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच परब, तुरूंगाची हवा खायला तयार व्हा! वसुलीखोर देशमुखांची सीबीआयद्वारे झाडाझडती झाली. आता तुमचा वसुलीकांड लवकरच बाहेर पडणार! तुमच्यासारख्या भ्रष्टाचाऱ्याला आता कोणीही वाचवू शकणार नाही, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

भ्रष्ट अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री देशमुखांसह अनिल परब यांचंही बिंग फोडलं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही परबांवर एक शब्दही काढला नाही. वाझे लादेन आहे का? असं बोलून त्याची पाठराखण करणारे आता आपल्या भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण कशी सोडतील ? एका अनिलवर कारवाई, दुसरा अनिल मोकाट...सगळ्याच वसुलीखोरांना अटक झाली पाहिजे, असेही ट्विट करत भाजप परब यांच्या अटकेसाठी आक्रमक झाले आहे. 

कोरोनाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांच्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. कर्मचाऱ्यांना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागला. तुम्ही केलेल्या या पापाची शिक्षा तुम्हाला तुमच्याच वसली कांडमुळेच मिळणार असल्याचे ट्विट भाजपकडून करण्यात आले आहे. 

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याला देशमुखांनी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप देशमुखांवर केला होता. दर महिन्याला शंभर कोटीची वसूलीचे आदेश देशमुखांनी दिले होते, असे पत्रात म्हटले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी वाझेने लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यासह परब यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. 

त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात देशमुख यांच्यासह वाझे व आणखी काही जणांची चौकशी केल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख